Maharashtra Assembly Session 2025 : मुंबई : मशिदी तसेच प्रार्थना स्थळांवरील भोंगे हा नेहमीच चर्चेचा मुद्दा असतो. आज हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. विविध भागातील प्रार्थना स्थळ, मशिदींवरील भोंग्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचा मुद्दा राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना वारंवार उपस्थित करत असतात. मुंबई उच्च न्यायालयाने 25 जानेवारी 2025 रोजी आदेश देऊन मशिदींसह प्रार्थना स्थळांकडून ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमांचे उल्लंघन होणार नाही, असे आदेश दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारा लक्षात आणून दिले. उत्तर प्रदेश सरकारने ज्याप्रकारे भोंग्यांवर कारवाई केली आहे, त्याप्रमाणे आपले राज्य सरकारही कारवाई करणार काय, असा प्रश्न आमदार फरांदे यांनी विचारला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासक उत्तर दिले. (action will be taken against the loudspeakers on mosque says cm devendra fadnavis)
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावण्याआधी परवानगी घेणे आवश्यक आहे. रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे बंद असायला हवेत. सकाळी 6 ते रात्री 10 वाजण्याच्या कालावधीत दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबलची आवाज मर्यादा असली पाहिजे. कायद्यानुसार अधिक डेसिबलने भोंगे वाजत असतील तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार केंद्रीय कायद्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. याची दखल घेऊन पोलिसांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवायचे आहे, अशी सध्या कायद्याची तरतूद आहे. मात्र याचा अवलंब सध्या होताना दिसत नाही, असे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
हेही वाचा – Leader Of Opposition : विधानसभेत खुर्चीचा खेळ, मुख्यमंत्री म्हणाले – शिंदे कालच म्हणाले, आम्ही अदलाबदल करतो
त्यामुळेच यापुढे कुणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निश्चित कालावधीसाठीच भोंगे लावता येतील. त्यानंतर पुन्हा भोंगे लावायचे असल्यास संबंधितांनी पुन्हा पोलिसांकडून परवानगी घ्यायला हवी. तसेच जिथे आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होईल, त्यांना पुन्हा परवानगी दिली जाणार नाही. त्या भोंग्यांची जप्ती केली जाईल. या नियमांचे तंतोतंत पालन होत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकांची असेल. आणि पोलीस निरीक्षकांनी याचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पोलीस निरीक्षकाने प्रत्येक प्रार्थना स्थळात जाऊन भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही, याची तपासणी करायला हवी. डेसिबल मोजून आवाजाची मर्यादा ओलांडली असेल तर पहिल्या टप्प्यात प्रदूषण नियंत्रक मंडळाला याची माहिती द्यायला हवी आणि दुसऱ्या टप्प्यात पुन्हा परवानग्या न देण्याचा मार्ग अवलंबायला पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सध्याच्या कायद्यानुसार पोलिसांकडे फारसे अधिकार नाहीत. कारण आजच्या परिस्थितीत कारवाईचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाला आहेत. त्यामुळे नियमांमध्येही काही बदल करणे आवश्यक आहे. हे बदल झाल्यास भोंग्यावर अधिक प्रभावी कारवाई करता येईल. यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून नियमांमध्ये बदल करण्यास सुचविले जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा – WHO : या 7 देशांतील हवा सर्वाधिक स्वच्छ, WHO च्या यादीनुसार भारताची काय परिस्थिती?