मुंबई – संतोष देशमुख हत्याकांडाने अडचणीत आलेले धनंजय मुंडे यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्या कृषिमंत्रीपदाच्या कार्यकाळातील कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे संसदेत महाराष्ट्रातील पीकविमा घोटाळ्याच्या चौकशीचे आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहे. दमानियांच्या पत्रकार परिषदेनंतर मंत्री धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
अंजली दमानियांची पत्रकार परिषद संपत असतानाच धनंजय मुंडे तातडीने अजित पवारांच्या भेटीला पोहोचले. आज (मंगळवार) दुपारी मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीपूर्वीच दमानियांनी धनंजय मुंडेंच्या घोटाळ्याचा बॉम्ब फोडला. यानंतर काही वेळातच मुंडे अजित पवारांच्या दालनात जाताना दिसले.
संतोष देशमुख हत्याकांडानंतर एकानंतर एक आरोपी हे धनंजय मुंडे यांचे जवळचे असल्याचे समोर येऊ लागले होते. हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड हा आपला निकटवर्तीय आहे, हे स्वतः धनंजय मुंडे यांनीही मान्य केले. या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासासाठी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरुवातीला राष्ट्रावादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार प्रकाश सोळंके यांनी केली. त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुरेश धस यांच्याकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील आर्थिक संबंध, वाळू, औष्णिक वीज केंद्रातील राख, आणि इतरही आर्थिक संबंध उघड करत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
अजित पवारांनी बीड जिल्हा नियोजन समिती बैठकीला हजेरी लावली, त्याआधी त्यांनी जिल्हा कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विकास कामातील भ्रष्टाचार आणि कोणतीही चूक खपवून घेणार नाही. कोणी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल असे म्हटले होते. त्यानंतर अंजली दमानियांनी आता मुंडे यांच्या कार्यकाळात झालेल्या कृषी खरेदीतील खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराचा आरोप केल आहे.
दमानियांचे आरोप काय ?
महायुती सरकारच्या गेल्या कार्यकाळात धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्याने शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून देण्याचे केंद्र सरकारचे आदेश धाब्यावर बसवले. महाबीज, केव्हीके आणि एमएआयडीसीच्या योजनांचे पैसे डीबीटी मार्फत न देता उपकरणांच्या खरेदीसाठी टेंडर काढण्यात आले. या टेंडरमध्ये बाजारभावाच्या दुप्पट दराने वस्तुंची खरेदी करण्यात आली. त्यासाठी धनंजय मुंडे यांनी पाठपुरावा करून डीबीटी घटकांच्या यादीतून काही गोष्टी वगळायला लावल्या. या सगळ्याच्या माध्यमातून किमान 88 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला.
हेही वाचा : Anjali Damania: धनंजय मुंडेंचा कृषी खात्यात 275 कोटींचा घोटाळा; भगवान गडानेच आता राजीनामा मागावा