मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मेळावा मुंबईत पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षाचे 42 आमदार निवडून आल्याबद्दल आश्चर्यं व्यक्त केले. अजित पवार यांच्या चार-पाच जागा येती की नाही, असं वाटत होते; पण, त्यांचे 42 आमदार निवडून आले, असं म्हणत राज ठाकरे यांनी निवडणूक निकालाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत. यानंतर आता राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस ( अजितदादा पवार ) युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“राज ठाकरे यांची गजनी चित्रपटातील हिरोसारखी परिस्थिती आहे. माझा त्यांना सल्ला आहे की, भाषणाला येताना त्यांनी आपण 2009, 2014, 2019 आणि आता 2024 मध्ये काय वक्तव्ये केली? ती सोबत आणावी. हे त्यांना पुढील काळात भाषणे करताना उपयोगी पडेल. गजनीसारखे लगेच विसरण्यापेक्षा, त्यांच्या लक्षात राहील. राज ठाकरे यांनी अजितदादांवर बोलू नये. कारण अजितदादा उठ दुपारी आणि घे सुपारीवाले नाहीत,” अशी टीका सूरज चव्हाण यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे-पाटलांचे उपोषण स्थगित; सरकारला इशारा देत म्हणाले, आता…
“अजितदादा सकाळी 6 वाजेपासून काम करतात. लोकांमध्ये जाऊन कामे मार्गी लावतात. राज ठाकरेंसारखे दुपारी उठायचे आणि सुपारी घेऊन बोलायचे, असं त्यांचं काम नाही. राज टाकरे यांच्या आमदाराला त्याच्या गावात एक मत पडले, कारण तो एकच व्यक्ती, त्या आमदाराने केलेल्या कामाचा लाभार्थी असेल. ज्या लोकांनी कामे केली नाहीत, ते निवडून कसे येतील?” असा टोला सूरज चव्हाण यांनी लगावला आहे.
राज ठाकरे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर सवाल उपस्थित केले होते. यावर सूरज चव्हाण म्हणाले, “बाळासाहेब थोरात यांच्या कामाचा आवाका मोठा आहे. परंतु, त्यांच्या कार्यकर्त्यांनी काम केले नाही. त्यामुळे त्यांचा पराभव झाला. बाळासाहेब थोरात यांच्याकडून राज ठाकरे यांनी शिकावे. कारण, ते टीकाटिप्पणी करून वेळ घालवण्यापेक्षा कामाला लागले आहेत.”
हेही वाचा : बैठकीत गरमागरमी! ‘लई मागचे बोलू नका, तुम्हाला….’, अजितदादांनी धस यांना सुनावले