मुंबई – पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेला वाद रायगडमध्ये शिगेला पोहचा आहे. रायगडमध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) असा सामना सुरु आहे. शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळावे अशी इच्छा आहे. मात्र रायगडचे पालकंत्रीपद राष्ट्रवादीकडे गेले. पक्षाच्या महिला नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेकडून (शिंदे) त्यानंतर रोष व्यक्त करण्यात आला. त्यानंतर रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे रायगडमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील वातावरण चांगलंच तापलं. त्यानंतर राज्य सरकारने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. आता या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. मात्र, रायगडमध्ये तटकरे विरुद्ध गोगावले असा संघर्ष चालू आहे. रायगडमधील शिवसेनेचे इतर आमदारही गोगावले यांच्याबरोबर आहेत.
बल्लाळेश्वर, हरिहरेश्वर, कनकेश्वर मंदिरात जायची तयारी
रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले म्हणाले होते की, “विधानसभा निवडणुकीत खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी काम केलं नाही, रायगडमधील शिवसेनेच्या (शिंदे) तिन्ही विद्यमान आमदारांना पाडण्याचा प्रयत्न केला”. मंत्री गोगावले म्हणाले, “पालीच्या बल्लाळेश्वराच्या मंदिरात जाऊन शपथ घेण्यासही मी तयार आहे”. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे म्हणाले की, “माझी देखील कोणत्याही मंदिरात जायची तयारी आहे. पालीचा बल्लाळेश्वर, हरिहरेश्वर, अलिबागच्या कनकेश्वर मंदिरात जायची माझी तयारी आहे. कारण आम्ही विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे महायुतीचं काम केलं आहे. अलिबागमध्ये महेंद्र दळवींसाठी, महाडमध्ये भरत गोगावले यांच्यासाठी काम केलं आहे. कारण लोकसभा निवडणुकीत या मंडळींनी प्रामाणिक काम केलं होतं. तसंच आम्ही विधानसभेला काम केलं. आम्ही आमची पूर्ण ताकद लावली होती”.
आम्हीही सगळं बाहेर काढू – अनिकेत तटकरे
आमदार महेंद्र थोरवेंनी खासदार सुनील तटकरेंना म्हटले बेईमानांचा बादशाह, त्यावर अनिकेत तटकरे म्हणाले की, आमदार थोरवे यांचं अशा प्रकारचं बोलणं खूपच हास्यास्पद आहे. कारण तेच गद्दारांचे बादशाह आहेत. थोरवे यांचे स्वीय सहाय्यक निवडणुकीच्या वेळी श्रीवर्धनमध्ये काय करत होते, कशा प्रकारे शिवसैनिकांना चिथावणी देत होते, जे शिवसैनिक महायुतीचं काम करत होते त्यांना काय सांगत होते ते सगळं आम्ही बाहेर काढू, असा इशारा तटकरेंनी दिला आहे.
हेही वाचा : Shiv Sena Vs Shiv Sena : उद्धव ठाकरेंना धक्का; माजी नगरसेविका राजुल पटेल यांचा शिंदे गटात प्रवेश