मुंबई – सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे भगवान गडाच्या आश्रयाला गेले आणि त्यांनी सामाजिक दबावाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोनच दिवसांत गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी घुमजाव करत गड गुन्हेगारांच्या नाही तर संतोष देशमुखांच्या पाठीशी असल्याचा खुलासा केला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. ऑफिस ऑफ प्रॉफिट प्रकरण धनंजय मुंडेंना भोवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे त्यांना फक्त मंत्रीपदाचा नाही तर आमदारकीचाही राजीनामा द्यावा लागेल, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्रीकाळातील घोटाळे दमानियांनी बाहेर काढले आहेत. हे पुरावे आता भगवान गडावर घेऊन जाणार असे सांगत दमानिया म्हणाल्या की, महंत नामदेव शास्त्री यांनीच आता धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला पाहिजे.
कशात केला मुंडेंनी भ्रष्टाचार
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषदे घेऊन धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळा समोर आणला आहे. नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत दमानिया यांनी अनेक पुराव्यांसह केला आहे.
एका वर्षाच्या कार्यकाळात धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यात अफाट पैसा खाल्ला असल्याचे अंजली दामनिया म्हणाल्या. अशा व्यक्तीला मंत्रीपदावर ठेवण्याची गरज आहे का, याचा विचार मुख्यमंत्री फडणवीसांनी करावा, असेही अंजली दमानिया म्हणाल्या.
भगवानगडाने मुंडेंचा पाठिंबा काढून घ्यावा
दरम्यान, बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडे आणि स्थानिक आमदार, खासदार यांच्यात खडाजंगी झाली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासमोरच हा वाद पेटला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी वंजारी समाजाचे धार्मिक स्थळ भगवानगड गाठले होते. तिथे मुक्काम करुन त्यांनी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यासोबत सामाजिक, राजकीय आणि अध्यात्मिक विषयांवर चर्चा केली होती. त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे याला मुलगा संबोधत त्याची पार्श्वभूमी गुन्हेगाराची नसताना त्याला गुन्हेगार ठरवले जात असल्याचे म्हटले होते. मात्र गड शंभर टक्के धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचे नामदेव शास्त्रींनी म्हटले होते. एक प्रकारे गडाच्या माध्यमातून सामाजिक दबाव आणण्याचा प्रयत्न धनंजय मुंडेंकडून झाला. तेव्हाही अंजली दमानिया यांनी नामदेव शास्त्रींना मंदिरात आलेले धनंजय मुंडेच माहित असतील त्यांना त्यांची दुसरी बाजू माहित नसल्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केले असले असे म्हटले होते. मात्र धनंजय मुंडेंनी काय-काय कारनामे केले त्याचे सर्व पुरावे सादर करणार असे म्हटले होते.
अंजली दमानिया यांनी आज धनंजय मुंडे यांचे घोटाळे उघड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी आग्रही मागणी केली, तसेच भगवान गडानही त्यांना दिलेला पाठिंबा काढून घ्यावा आणि आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करावी, अशी विनंती भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींना केली आहे.
हेही वाचा : Beed Murder : विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये सर्व पुरावे; आरोपींची स्पेशल रिमांड घेऊन पुरावे हस्तगत करा