HomeमहामुंबईमुंबईAkshay Shinde : अक्षय शिंदेला नराधम म्हणणे अन् त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट उघड...

Akshay Shinde : अक्षय शिंदेला नराधम म्हणणे अन् त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट उघड करणे अंगलट येणार? शिवसेनेच्या दोन मंत्र्यांना नोटीस

Subscribe

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात पाच पोलिसांवर ठपका ठेवण्यात आला आहे. यातच आता दोन मंत्र्यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या वकिलांनी शिंदे गटाच्या दोन मंत्र्यांना नोटीस पाठवली आहे. अक्षय शिंदेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. असे असताना त्यासंदर्भात वक्तव्ये केल्यानं नोटीस बजावली आहे. दोन दिवसांत उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही अक्षय शिंदेच्या वकिलांनी दिला आहे.

मंत्री योगेश कदम आणि मंत्री संजय शिरसाट यांना अक्षय शिंदेच्या वकिलांनी नोटीस बजावली आहे. योगेश कदम यांनी अक्षय शिंदेच्या बोटांच्या ठशाबद्दल वक्तव्य केले होते. तर, संजय शिरसाट हे अक्षय शिंदेला सातत्याने नराधम बोलत आहेत. यावरच वकिलांनी आक्षेप घेतला आहे.

हेही वाचा : दादा, अण्णा अन् ताई पुण्यात चाललंय तरी काय? कुणीही येतं गाड्या फोडून जाते

नोटीसमध्ये काय?

अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे पावसात वाहून गेल्याचा फॉरेन्सिक अहवाल योगेश कदम यांनी जाहीर केला. हा गोपनीयतेचा भंग आहे. त्यासह संजय शिरसाट हे अक्षय शिंदेला सातत्याने नराधम असल्याचं म्हणत आहेत. यावर आक्षेप घेत शिंदेच्या वकिलांनी दोन्ही नेत्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे दोन्ही नेते नोटीसला काय उत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

अक्षय शिंदेची हत्याच, पाच पोलिस जबाबदार, चौकशीत ठपका

दरम्यान, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूस पोलीस वाहनाच्या चालकासह पाच पोलीस जबाबदार असल्याचे दंडाधिकारी चौकशीतून निष्पन्न झाले आहे. या पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने 20 जानेवारीला सरकारला दिले आहेत.

न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. ठाणे क्राइम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे, मुख्य हवालदार अभिजित मोरे, हवालदार हरीश तावडे आणि पोलीस वाहनाचा चालक अशा पाच जणांच्या पथकावर दंडाधिकाऱ्यांनी ठपका ठेवला आहे.

पोलिसांनी बनावट चकमकीत आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी याचिकेद्वारे केला आहे. याच्या तपासासाठी एसआयटी नेमावी, अशी मागणीही त्यांनी न्यायालयात केली होती. त्यावर, दंडाधिकारी चौकशी सुरु असल्याचे सरकारने न्यायालयाला सुरुवातीच्या सुनावणीत सांगितले होते.

दंडाधिकाऱ्यांचा अहवाल सादर करण्यात आला. तो वाचल्यानंतर न्यायालयाने, पोलिसांकडून बळाचा वापर होणे न्याय्य नाही. पोलीस परिस्थिती सहजपणे हाताळू शकले असते, अशी टिप्पणी केली. त्यावर, राज्य सरकार कायद्यानुसार कारवाई करेल आणि गुन्हाही दाखल करेल, असे मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी उच्च न्यायालयाला सांगितले.

हेही वाचा : ‘ते’ विधान भोवणार? विखेंविरोधात ठाकरेंच्या नेत्याची उच्च न्यायालयात धाव