Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईमुंबईAkshay Shinde : आम्हाला केस लढायची नाही, बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबाची न्यायालयात भूमिका, काय घडले?

Akshay Shinde : आम्हाला केस लढायची नाही, बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबाची न्यायालयात भूमिका, काय घडले?

Subscribe

मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत एन्काऊंटर झाला होता. परंतु, अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांनी हा खटला चालवायचा नसल्याची भूमिका घेतली आहे. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही. परंतु, आम्हाला खटला चालवायचा नाही, अशी भूमिका अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात मांडली आहे. आता शुक्रवारी ( 6 फेब्रुवारी ) पुन्हा याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत एन्काऊंटर झाला होता. त्याप्रकरणी अक्षय शिंदेच्या वडिलांनी पोलिसांनी बनावट चकमकीत मुलाची हत्या केल्याचा आरोप याचिकेद्वारे केला होता. यानंतर अक्षय शिंदेची बनावट चकमकीत हत्या झाल्याचे दंडाधिकारी चौकशीत निष्पन्न झाले होते. याप्रकरणी अक्षय शिंदेच्या मृत्यूस पोलीस वाहनाच्या चालकासह पाच पोलीस जबाबदार असल्याचं सांगून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने 20 जानेवारीला सरकारला दिले होते.

हेही वाचा : 2 लाखांवर समाधानी नाही, हिंसाचारच्या घटना सांगताना करूणा शर्मा-मुंडेंना रडू कोसळले; म्हणाल्या, बहिणीवर…

परंतु, अक्षय शिंदेचा एन्काऊंटर प्रकरणी दोषी असलेल्या पाच पोलिसांवर काय कारवाई केली? यावर गुरूवारी ( 6 फेब्रुवारी ) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, दिवसाचे काम संपताना न्यायालयात उपस्थित असलेल्या अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी पुढे येत हे प्रकरण आम्हाला लढवायचे नाही, अशी विनंती न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांना हात जोडून केली.

नेमकं न्यायालयात काय घडले?

‘अक्षय शिंदेचे बनावट एन्काऊंटरचे प्रकरण आता यापुढे न्यायालयात लढवायचे नाही,’ असं आई-वडिलांनी न्यायालयाला सांगितलं. तेव्हा, तुम्ही असा निर्णय का घेत आहात? तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? असे न्यायालयाने त्यांना विचारले. त्यावर अक्षय शिंदेचे आई-वडील म्हणाले, ‘आता ही धावपळ आम्हाला जमत नाही. आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. आमच्या सुनेला नुकतेच मूल जन्माला आलेले आहे. आम्हाला आता त्याच्याकडे जायचे आहे. त्यामुळे ही दररोजची धावपळ आणि प्रवास आम्हाला जमत नाही. आमच्या राहण्याची सोय कुठेही नाही. अशात आम्हाला हा न्यायालयीन लढा लढायचा नाही.’

याप्रकरणी पुन्हा उच्च न्यायालयात शुक्रवारी ( 7 फेब्रुवारी ) सुनावणी होणार आहे. शुक्रवारी उच्च न्यायालय काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : न्यायालयाचा धनंजय मुंडेंना धक्का! करूणा शर्मा-मुंडेंना महिन्याला ‘एवढी’ रक्कम देण्याचे आदेश