मुंबई – कथित खिचडी घोटाळ्यातील आरोपी शिवसेना ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सूरज चव्हाण यांना कोविड काळातील खिचडी घोटाळ्यात 17 जानेवारी 2024 रोजी अटक करण्यात आली होती. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी खिचडी घोटाळ्याचे आरोप केले होते, त्यानंतर सूरज चव्हाण यांना अटक झाली होती.
सूरज चव्हाण हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर सूरज चव्हाण यांना ईडीने 17 जानेवारी 2024 रोजी अटक केली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फे (EOW) खिचडी घोटाळा प्रकरणी एफआयआर नोंदविला होता.
काय आहे कथित खिचडी घोटाळा?
कोविड काळात परप्रांतीय मजुरांसाठी खिचडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात खिचडीत माप मारण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. घोटाळ्याप्रकरणी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसह अन्य काही जणांना 2 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा मलिदा मिळाल्याचे सांगण्यात आले होते. यातील आरोपींनी स्थलांतरित मजुरांसाठी खिचडी बनवण्याचे कंत्राट बेकायदेशीररीत्या मिळवले. शिवाय, कराराचे उल्लंघन करत दुसर्या एजन्सीला उपकंत्राटही दिल्याचा आरोप होता. या प्रकरणी सूरज चव्हाण यांची जुलै 2023 मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती. या घोटाळ्यामध्ये सूरज चव्हाण यांचा संबंध असल्याचा संशय ईडीला असून त्याअनुषंगाने अटकेची कारवाई करण्यात आली होती.
किरीट सोमय्यांचे आरोप काय?
सूरज चव्हाण यांच्या माध्यमातून किरीट सोमय्या यांनी थेट आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. सूरज चव्हाण यांच्या अटकेआधी सोमय्यांनी आरोप केला होता की, “ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांना, बेनामी कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. सूरज चव्हाण यांच्या खात्यात दीड कोटींहून अधिक रुपये दिले गेले. ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार अमोल गजानन कीर्तिकर यांच्या खात्यात पण पैसे गेले गेल्याचा आरोप केला होता. ज्या तक्रारी दाखल झाल्या आहेत, त्या कंपन्यांमधून अमोल कीर्तिकर यांच्या खात्यात एक कोटी 65 लाख रुपये दिले. याशिवाय संजय राऊत यांचे भागिदार सुजित पाटकर यांचा राजीव साळुंके सह्याद्री बदलीवर आलेल्या सूरज चव्हाण यांच्या खात्यात एका कंपनीमधून एक कोटी वीस लाख रुपये गेले. ते पैसे कशासाठी? असा प्रश्न विचारला होता ? आम्ही खिचडी कशी बनवायची यासाठी सल्लागार नेमला आहे. किती तांदूळ, किती डाळ याची सल्लागाराचे कोट्यावधी रुपये आणि बोगस बिल बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून लाखो रुपये काढण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.
हेही वाचा : Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संजय राऊतांचे टीकास्त्र; संसदेचा मॅरेज हॉल करुन टाकला