मुंबई : वांद्रे (पश्चिम) येथे सागरी सेतूनजीक मुंबई महापालिकेच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्रामुळे समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता आणि सागरी जीवनामध्ये चांगलीच सुधारणा होणार आहे, असा विश्वास मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी व्यक्त केला आहे. वांद्रे मलजल प्रक्रिया केंद्रातील कामांच्या प्रगतीची महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी शनिवारी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. (Bandra Sewage Treatment Plant will improve sea water quality and marine life)
वांद्रे पश्चिम परिसरात सागरी सेतू नजीक, मुंबई महापालिकेच्या मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाच्यावतीने वांद्रे मलजल प्रक्रिया केंद्राचे बांधकाम करण्यात येत आहे. सुमारे 360 दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या या प्रकल्पाची प्रारंभीची संरचनाविषयक कामे होवून उभारणीने आता वेग घेतला आहे. यावेळी, उपआयुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) राजेश ताम्हाणे, उप प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प)राजेंद्र परब, कंत्राटदार एल ऍण्ड टीच्या वतीने प्रकल्प व्यवस्थापक विनया हेब्बार, सल्लागार कंपनी आयव्हीएल यांचे वतीने मुरली हे यावेळी उपस्थित होते.
वांद्रे मलजल प्रक्रिया केंद्राचे रचना, बांधकाम आणि प्रचालन व परिरक्षण करण्याचे काम कंत्राटदार मे. लार्सेन अँड टुब्रो लि. यांना दिनांक 31 मे 2022 रोजी प्रदान केले गेले. प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी निर्मिती करण्याचे काम दिनांक 05 जुलै 202 पासून सुरू झाले. प्रकल्पाची रचना व बांधकाम कालावधी 5 वर्षे इतका आहे. 4 जुलै 2027 पर्यंत प्रकल्पाची सर्व कामे पूर्ण होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पाचे सल्लागार म्हणून मेसर्स आयव्हीएल इंडिया एन्व्हायर्नमेंटल आर अँड डी प्रा. लि. जबाबदारी सांभाळत आहेत.
हेही वाचा – Nitesh Rane : हिंदूं मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू नये यासाठी संघटन निर्माण करणार
प्रारंभी महापालिका आयुक्त गगराणी यांनी प्रकल्पाच्या प्रतिकृती (मॉडेल) ची पाहणी केली. तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अंतिमतः कसे असेल, त्याची आभासी प्रतिमा (व्हर्च्युअल मॉडेल) देखील ‘व्हर्च्युअल रिऍलिटी ग्लासेस’ द्वारे पाहिली. त्यानंतर संगणकीय सादरीकरणातूनही माहिती सादर करण्यात आली. प्रकल्पस्थळी बांधकामाच्या प्रगतीची तसेच सागरी पातमुख (आऊटफॉल), बांधकामाला लागणाऱ्या पाण्याची गरज भागविण्याकरिता नुकताच उभारण्यात येत असलेला प्रतिदिन २५० किलो लीटर क्षमतेचा कंटेनराइज्ड मलजल प्रक्रिया केंद्र आणि कामगारांचे शिबीर यांची गगराणी यांनी पाहणी केली.
उपआयुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे यांनी माहिती देताना सांगितले की, या प्रकल्पाची स्थापत्यविषयक प्रारंभिक कामे पूर्ण झाल्याने आता पुढील बांधकामाची स्थापत्य कामे वेगाने सुरु झाली आहेत. सन 2025 आणि 2026 या दोन्ही वर्षांमध्ये पावसाळ्यातही कामे होतील, अशारितीने नियोजन करण्यात आल्याने हा प्रकल्प ठरवलेल्या मुदतीत पूर्ण होईल. या प्रकल्पाचा प्रचालन व परिरक्षण कालावधी 15 वर्षे आहे, असे त्यांनी नमूद केले.
125 अभियंते आणि 800 कामगार कार्यरत
प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) राजेश ताम्हाणे यांनी नमूद केले की, वांद्रे मलजल प्रक्रिया प्रकल्पाची भौतिक प्रगती 21 टक्के झाली आहे. स्थापत्य कामांनी पकडलेला वेग लक्षात घेता संयंत्रांची मागणी, खरेदी या प्रक्रिया देखील सुरु करण्यात आल्या आहेत. प्रकल्प स्थळी असणारी सुमारे 265 झाडे ही मालाड तसेच संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य आदी परिसरांमध्ये नेवून तेथे यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी कामे सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 17 लाख 70 हजार मनुष्यबळ तास इतके काम करण्यात आले आहे. कंत्राटदाराचे 100 अभियंते, सल्लागारांचे 15 अभियंते तर महापालिकेचे 10 अभियंते अशी एकूण सुमारे 125 अभियंत्यांची फळी दररोज कार्यरत आहे. सुमारे 800 कामगार या प्रकल्पासाठी परिश्रम घेत आहेत. मोठ्या प्रमाणावर स्थापत्य कामे, संयंत्रे असूनही कामगार, कर्मचारी सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. कामे करताना आतापर्यंत अवघ्या 10 जणांना फक्त प्रथमोपचाराची गरज भासली. एकही अपप्रसंग घडणार नाही, याची सर्वोच्च काळजी घेण्यात येत असल्याचे त्यातून सिद्ध होते, असे त्यांनी नमूद केले.
समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता आणि सागरी जीवनामध्ये सुधारणा होईल
उप प्रमुख अभियंता राजेंद्र परब यांनी सांगितले की, नवीन मलजल प्रक्रिया केंद्राची रचना आणि बांधणी करताना अस्तित्वात असलेल्या मलजल प्रकल्पाचे प्रचालन व परिरक्षण देखील योग्यरित्या करण्यात येत आहे. नवीन प्रकल्पासाठी 8.36 हेक्टर एवढ्या उपलब्ध मर्यादीत जागेत हा प्रकल्प बांधण्यात येत आहे. असे असले तरी या सर्व बाबींचा प्रकल्पाची संकल्पना, संरचना यामध्ये सुयोग्य विचार करण्यात आल्याने प्रगतीपथावरील कामांना कोणताही अडथळा आलेला नाही. नवीन प्रकल्पात गाळ प्रक्रिया, प्रक्रियेअंती तयार होणाऱ्या बायोगॅसपासून वीज निर्मिती त्याचप्रमाणे नॉलेज सेन्टर व व्हीविंग गॅलरीचा देखील समावेश आहे. नवीन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता आणि सागरी जीवनामध्ये सुधारणा होईल. तसेच माहीम, वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकूल (बीकेसी), खेरवाडी आणि सांताक्रूझ परिसरातील लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे, असे परब यांनी नमूद केले.
दररोज 360 दशलक्ष लीटर मलजलावर द्वितीय स्तरीय प्रक्रिया
प्रकल्प व्यवस्थापक हेब्बार यांनी सांगितले की, सध्या वांद्रे येथे अस्तित्वात असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्रात मलजलावर प्राथमिक प्रक्रिया करून ते पुढे सागरी पातमुखाद्वारे खोल समुद्रात सोडले जाते. त्याऐवजी आता या नवीन प्रकल्पामध्ये दररोज 360 दशलक्ष लीटर मलजलावर द्वितीय स्तरीय प्रक्रिया केली जाईल. त्यापैकी 180 दशलक्ष लीटर मलजलावर दररोज पुढील तृतीय स्तरीय प्रक्रिया केली जाईल. या प्रकल्पामध्ये मेम्ब्रेन बायो रिऍक्टर (एमबीआर) हे तंत्रज्ञान वापरात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Narendra Modi : एक दशकाच्या आपदापासून दिल्लीची सुटका, मोदींनी केजरीवालांवर साधला निशाणा
कामाला वेग देण्याचे निर्देश
प्रकल्पाच्या एकूणच प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून पाहणीअंती महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी निर्देश दिले की, प्रकल्पाची प्रारंभिक कामे पूर्ण झाली असल्याने आता पुढील कामांना जास्तीत जास्त वेग द्यावा. जागेची मर्यादा असली तरी प्रकल्पातून निघणारा गाळ अन्यत्र नेवून त्यावर प्रक्रिया करण्याऐवजी प्रकल्पस्थळीच प्रक्रिया करुन त्यातून खतनिर्मिती करता येईल किंवा कसे, याची चाचपणी करावी. त्यासाठी खतनिर्मिती क्षेत्रातील कंपन्या, संस्था, तज्ज्ञ यांच्याशी संपर्क साधावा. कमी जागेत साध्य अशा अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी. प्रकल्पस्थळीची गाळ प्रक्रिया होऊ शकली तर वाहतूक व अन्य खर्चांमध्ये, वेळेमध्ये बचत होऊ शकेल तसेच प्रशासनाच्या दृष्टिने ते सुलभ होईल, अशी सूचना देखील आयुक्तांनी केली.