मुंबई (मारुती मोरे) : केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त यांच्यासोबत महापालिका मुख्यालयात बैठक घेत पश्चिम उपनगरातील विविध समस्या, योजना, प्रकल्प यांना गती देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महापालिका प्रशासन चांगलेच कामाला लागले आहे. त्याच अनुषंगाने आयुक्त भूषण गगराणी यांनी गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयाच्या ठिकाणी आज धावती भेट देत रुग्णालयाच्या कामाला गती देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. (Bhushan Gagrani instructions to speed up the work of Siddhartha Hospital)
गोरेगाव (पश्चिम) येथील सिद्धार्थ नगर महापालिका सर्वसाधारण रुग्णालय पुनर्विकास कामाला गती द्यावी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी रुग्णालयातील वैद्यकीय सेवा टप्प्या-टप्प्यात सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यावेळी, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, संचालक (अभियांत्रिकी) गोविंद गारूळे, सहाय्यक आयुक्त (पी उत्तर) संजय जाधव, प्रमुख अभियंता (इमारत परिरक्षण) मेहूल पेंटर, सिद्धार्थ रूग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. महारूद्र कुंभार याप्रसंगी उपस्थित होते.
हेही वाचा – Devendra Fadnavis : दावोस दौऱ्यावरून विरोधकांची टीका; मुख्यमंत्री म्हणाले, मूळात ही असूया
सध्या चौथ्या मजल्यापर्यंत काम पूर्ण
सिद्धार्थ रुग्णालयाच्या 11 मजली इमारती बांधकामापैकी सध्या चौथ्या मजल्यापर्यंत काम पूर्ण झाले आहे. रुग्णालयाचे पुढील बांधकाम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचनाही आयुक्त गगराणी यांनी संबंधितांना यावेळी दिल्या. सिद्धार्थ नगर महापालिका सर्वसाधारण रूग्णालयाच्या इमारतीत 306 रूग्णशय्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकूण 11 मजली इमारतीमध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधा असतील.
प्रकल्पाचे काम 36 महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजित
दरम्यान, सुमारे 48 हजार 588 चौरस मीटर क्षेत्रात इमारतीचे बांधकाम सुरू आहे. रुग्णालय इमारतीसह शवविच्छेदन केंद्र, रहिवासी डॉक्टरांसाठी इमारत, कर्मचारी वर्गासाठी इमारत आदींसाठीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या कामाशी संबंधित विविध प्रमाणपत्रे विभागांमार्फत मिळवण्याची कार्यवाही सुरू आहे. या प्रकल्पाचे काम 36 महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजित आहे. रुग्णालयातील सुविधांमध्ये विविध आजारांसाठीचे बाह्यरुग्ण विभाग तसेच शस्त्रक्रिया विभाग, विविध चाचण्यांशी संबंधित निदानासाठी प्रगत स्वरूपाच्या प्रयोगशाळा समाविष्ट असतील. सुपर स्पेशालिटी अंतर्गत विविध आजारांसाठीचे निदान व उपचार सुविधा देखील पुरवण्यात येणार आहे.
हेही वाचा – Uddhav Thackeray : पाठीत वार केला तर वाघनखं काढू, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल