मुंबई – राज्यात महायुतीची सत्ता आली, पूर्ण बहुमताचे सरकार आले. 237 आदारांचा पाठिंबा देवेंद्र फडणवीसांना आहे. मात्र महायुतीमध्ये अजुनही सर्वकाही आलबेल नाही, हे वेळोवेळी विरोधकांकडून समोर आणले जात आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात धुसफूस सुरु आहे. तर शिंदे गटाच्या आमदारांवर देवेंद्र फडणवीसांचे नियंत्रण असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यासोबतच त्यांनी एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी ‘वर्षा’ येथे राहायला का जात नाही, याचे उत्तर काळीजादूवाल्यांनी द्यावे असा सवाल केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरही काळीजादू केली जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ येथे मुक्कामाला गेलेले नाही. ते ‘सागर’ याच शासकीय निवासस्थानी मुक्कामी आहेत. मुख्यमंत्री फडणवीस वर्षा बंगल्यावर रहायला का जात नाही, याचे उत्तर काळीजादूवाल्यांनी द्यावे, असा थेट सवाल संजय राऊत यांनी नितेश राणेंना केला आहे.
मातोश्रीवर काळीजादू
उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेले. त्यानंतर त्यांना वर्षा बंगला सोडावा लागला. ते आता त्यांच्या मातोश्री निवासस्थानी असतात, मात्र मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे मातोश्री येथे काळीजादू केली जात असल्याचा टोला मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी लगावला. सामनातील रोखठोकवर बोलताना ते म्हणाले की, “मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे मातोश्री येथे किती लिंबू फोडले जात आहेत, किती काळीजादू केली जात आहे, किती उपवास केले जात आहेत. त्याबद्दलपण संजय राऊतांनी थोडं लिहावं,” असे टोला मंत्री राणेंनी लगावला. त्यांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी रहायला का जात नाही, याचे उत्तर काळीजादूवाल्यांनी दिले पाहिजे, माझ्या नादाला लागू नका,” असा इशाराही त्यांनी राणेंना दिला.
वर्षा बंगल्यावर टोपलीभर लिंबू
तर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही काळीजादू वादात उडी घेतली. ते म्हणाले की, “मला वाटतं काळीजादू काय हे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा टोपलीभर लिंबू मिळाले. काळी जादू काय आहे त्यांना विचारा. त्यांचा अनुभव अधिक असावा,” असा टोला कदमांनी लगावला.
एकनाथ शिंदे दरेगावी का जातात?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा जेव्हा त्यांच्या दरेगावी जातात तेव्हा आमदार आदित्य ठाकरे हे आज अमवस्या आहे का तपासा, असे म्हणून शिंदेंना टोला लगावतात.
महाराष्ट्रात जादूटोणा प्रतिबंधक कायदा आहे. मात्र राज्याच्या प्रमुख नेत्यांकडूनच जाहीरपणे काळीजादूचा उल्लेख होतो, तेही मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी हे प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र असा प्रश्न निर्माण होत आहे.
हेही वाचा : Shiv Sena : 2024 नंतरही मुख्यमंत्री राहणार या आश्वसानामुळेच एकनाथ शिंदे फुटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा