मुंबई (मारुती मोरे) : येत्या रविवार म्हणजेच 19 जानेवारी रोजी मुंबईत ‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2025’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा 2025’ पहाटे 5 ते दुपारी 1.30 या कालावधीत पार पडणार आहे. यंदा 13 हजारांहून अधिक धावपटू या मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी तयार आहेत. या मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक रस्ते बंद असणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. यानंतर आता बेस्ट बसगाड्यांच्या प्रवर्तनात बदल करण्यात आला आहे. (Changes in BEST bus operation for Tata Mumbai Marathon 2025)
‘टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा 2025’ स्पर्धेचा मुख्य मार्ग हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा चौक चर्चगेट, मरिन ड्राईव्ह, पेडर रोड, हाजी अली, वांद्रे, वरळी कोस्टल रोड, माहिम, प्रभादेवी आणि हाजी अली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा असणार आहे. या निमित्ताने मुंबई वाहतूक पोलिसांतर्फे या मार्गावरील वाहतुकीवर निर्बंध लावण्यात येणार आहेत. परिणामी, या मार्गावरून प्रवर्तित होणारे बसमार्ग हे सायन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जे.जे. रुग्णालय, वाडीबंदर, पी. डिमेलो रोड मार्गे तसेच सायन येथून माहिम, सेनापती बापट मार्ग, डॉ. ई. मोझेस मार्ग, महालक्ष्मी स्थानक आणि सातरस्ता मार्गे प्रवर्तित करण्यात येतील. तसेच बसमार्ग क्र. ए-78, ए-89, ए-105, ए-106, ए-108, ए-112, ए-123, ए-132, ए-155 या बसमार्गाचे प्रवर्तन या स्पर्धेदरम्यानच्या काळात तात्पुरते स्थगित करण्यात येणार आहे.
हेही वाचा – KEM Hospital : राजकीय इच्छाशक्ती अभावी केईएमचा विस्तार 2008 पासून कागदावरच
वाहतुकीचे निर्बंध आणि वेळा
मॅरेथॉन सुलभ करण्यासाठी 19 जानेवारी 2025 रोजी पहाटे 3 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. मॅरेथॉन मार्गावरील रस्ते सामान्य वाहतुकीसाठी बंद असतील. तर आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा वाहनांना प्रवेश असेल. याव्यतिरिक्त, दक्षिण मुंबईत पहाटे 2 वाजल्यापासून 24 तासांसाठी जड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
पर्यायी मार्ग
दक्षिण मुंबई ते उत्तर मुंबई (विमानतळ आणि उपनगरे) साठी
शहीद भगतसिंग मार्ग → पी. डी’मेलो रोड → डॉकयार्ड स्टेशन रोड → बी. नाथ पै मार्ग → आर.ए. किडवाई मार्ग → डॉ. बी.ए. रोड → सुलोचना शेट्टी मार्ग → ६० फूट रस्ता → टी-जंक्शन → सायन-वांद्रे लिंक रोड → कलानगर जंक्शन → वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (डब्ल्यू.ई.एच.) → विमानतळ.
विमानतळ आणि उत्तर मुंबई ते दक्षिण मुंबई
विमानतळ → डब्ल्यू.ई.एच. → कलानगर जंक्शन → सायन-वांद्रे लिंक रोड → टी-जंक्शन → ६० फूट रस्ता → सुलोचना शेट्टी मार्ग → डॉ. बी.ए. रोड → आर.ए. किडवाई मार्ग → बी. नाथ पै मार्ग → डॉकयार्ड स्टेशन रोड → पी. डी’मेलो रोड → शहीद भगतसिंग मार्ग.
हेही वाचा – BMC : यापुढे अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्सवर होणार बेधडक कारवाई, पालिकेचा निर्णय