मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्यापासून तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस 29 ते 31 जानेवारी असे तीन दिवस दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारासाठी जाणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत देवेंद्र फडणवीस आहेत.
देवेंद्र फडणवीसांच्या एका दिवशी तीन सभा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या 29 जानेवारी रोजी दिल्लीतील डीसी चौक, सेक्टर 9 रोहिणी येथे भाजप उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत. तर त्यानंतर पहाडगंज भागात मराठी प्रकोष्ठ बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. 30 आणि 31 जानेवारी रोजी सुद्धा त्यांच्या दिल्लीत सभा असतील. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत देवेंद्र फडणवीस आहेत.
दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारीला मतदान
दिल्ली विधानसभेसाठी येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. येथे सध्या आम आदमी पार्टीचे सरकार आहे. आप विरुद्ध भाजपा आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होत आहे. दहा वर्षांपासून दिल्ली विधानसभा आपच्या ताब्यात आहे. केंद्रात भाजपाचे सरकार आहे, मात्र दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचे राज्य आहे. यंदा भाजपने दिल्ली जिंकण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी भाजपचे विविध राज्यातील मुख्यमंत्रीही आता शेवटच्या टप्प्यात प्रचारात उतरणार आहेत.
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक होत आहे. एकूण 699 उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची सध्या मोठी चर्चा आहे. 699 पैकी 132 उमेदवारांवर गु्न्हे दाखल आहेत. त्यापैकी 81 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गु्न्हे दाखल आहेत. तर दुसरीकडे उमेदवारांची संपत्ती ही कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारी आहे. एकूण उमेदवारांपैकी 23 उमेदवारांची मालमत्ता 50 कोटींपेक्षा अधिक आहे. तर सरासरी 5 कोटी 65 लाख उमेदवारांची मालमत्ता आहे.