मुंबई : मुंबई महापालिकेने 14 हजार कोटी रुपये खर्चून बनवलेल्या देशातील पहिल्या ‘कोस्टल रोड’चे 94 टक्के काम पूर्ण झाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कोस्टल रोड’च्या नरिमन पॉंईंटकडून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण रविवारी (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिनी करण्यात आले. यापूर्वी दक्षिणेकडे येण्यासाठी बांधलेल्या पहिल्या पुलाचे लोकार्पण 12 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले होते. सोमवारीपासून उत्तर वाहिनीवरील वाहतूक सुरू करण्यात आली. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दक्षिण वाहिनी पुलावरून 21,639 वाहनांनी तर उत्तर वाहिनी पुलावरून 15,583 वाहनांनी प्रवास केल्याची नोंद करण्यात आली आहे. रात्री 12 वाजेपर्यंत त्यामध्ये आणखीन काही हजार वाहनांची भर पडण्याची शक्यता आहे. (Coastal Road more than 21 thousand vehicles travel on North South channel)
हेही वाचा : GBS : पुण्यातील आजाराप्रकरणी केंद्र सरकार अॅक्शन मोडवर, स्थानिक प्रशासनाला करणार मदत
विशेष म्हणजे कोस्टल रोड प्रकल्पावरून 12 मार्च 2024 ते 31 डिसेंबर 2024 अखेरपर्यंत 50 लाख वाहनांनी ये-जा केली आहे. तसेच या मार्गावरून दररोज सरासरी 18 ते 20 हजार वाहनांचा प्रवास सुरू असतो, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. ‘कोस्टल रोड’ प्रकल्पामुळे मुंबई शहर भागातील मंत्रालय, मरीन ड्राईव्ह इत्यादी परिसरातून पश्चिम उपनगरातील मुंबईचे शेवटचे टोक असलेल्या दहिसरपर्यंत कोस्टल रोड आणि वांद्रे – वरळी सी लिंक जोडले गेल्याने वाहनांद्वारे ये-जा करणे खूपच सुरळीत झाले आहे. या कोस्टल रोड आणि सी लिंकमुळे वाहन चालकांच्या इंधन, वेळ यात मोठी बचत झाली आहे. तसेच, वांद्रे – वरळी येथून मरीन ड्राईव्हपर्यंतचा प्रवास अवघ्या 15 मिनिटात पूर्ण करणे शक्य झाले. त्यामुळे मुंबईकरांना आणि मुंबई बाहेरून मुंबईत वांद्रे – वरळी मार्गे मंत्रालय, चर्चगेट, मरीन ड्राईव्ह पर्यंतचा प्रवास करणे अत्यंत सुलभ झाले आहे. त्यामुळे वाहनांच्या वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत झाली आहे. तसेच, प्रदूषण कमी झाले आहे. त्यामुळे कोस्टल रोड ते वांद्रे – वरळी सी लिंक असा वाहनाद्वारे प्रवास करण्याचा वेगळा आनंद वाहन चालकांना मिळत आहे.
रविवारी प्रजासत्तकदिनीच वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन आदी भागातील प्रवाशांना किनारी रस्ता प्रकल्पावर ये-जा करण्याची सुविधा देणाऱ्या तीन आंतरमार्गिकांचे लोकार्पण देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सोमवारपासून उत्तर वाहिनी प्रवासासाठी खुली करण्यात आली. यापूर्वी दक्षिण वाहिनी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे आता वांद्रे-वरळी सी-लिंक आणि कोस्टल रोड मार्गे प्रवास करणे अधिक सुविधाजनक झाले आहे. फरक एवढाच आहे की, वांद्रे-वरळी सी लिंक वरून प्रवास करताना टोल भरावा लागतो. पण कोस्टल रोडवरून प्रवास करताना सध्या टोल भरावा लागत नाही. त्यामुळे वाहन धारकांना तेवढाच दिलासा मिळत आहे.