मुंबई : मुंबईत गोरेगाव, दहिसर आदी ठिकाणी गायगुरांचे गोठे आहेत. या गोठ्यातील घाण, शेण, मलमूत्र हे नाल्यात, नदीत वाहून जाते. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते आणि नद्यांमधील पाणी प्रदूषित होते. मुंबईमधून गुरांचे गोठे हटविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यास गोठ्याच्या मालकांनी विरोध दर्शविला, मात्र अद्यापही गुरांचे गोठे आहे तिथेच आहेत. आता त्यामध्ये उपनगरातील पदपथावर नव्याने उभारण्यात आलेल्या गाई, म्हशींच्या गोठ्याची वेगळी भर पडत आहे. त्यामुळे हे पदपथांवरील गोठे हटविण्याचे नवीन आव्हान महापालिकेसमोर उभे राहिले आहे. आणखीन कहर म्हणजे या गुरांच्या गोठ्याचे मालक, चालक हे गाई, म्हशींचे दूध काढून विकतात, मात्र त्यांची घाण, शेण, शिल्लक चारा, त्यांचे मलमूत्र हे प्लास्टिक गोणी, चटई यांद्वारे जमा करून रस्त्यालगत अथवा पदपथावर टाकण्यात येणार्या कचर्यामध्ये सर्रासपणे फेकून देत असल्याचे निदर्शनास येते, मात्र महापालिकेकडून ठोस कारवाई होताना दिसून येत नाही. (Cow sheds fill the sidewalks in Mumbai)
मुंबई महापालिका शहरात दररोज निर्माण होणार्या कचर्याचे प्रमाण कमी करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध उपाययोजना करीत आहे. त्यामुळे कचर्याचे प्रमाण हे 10 हजार मेट्रिक टनवरून घसरून आता 6,500 मेट्रिक टनवर आले आहे. कचर्याचे हे प्रमाण आणखीन कमी करण्याचे पालिकेचे नियोजन आहे, मात्र या सर्व उपाययोजना करताना दहिसर, गोरेगाव, आरे कॉलनी आदी ठिकाणी असलेल्या गाई, म्हशींच्या गोठ्यात दररोज निर्माण होणारे मलमूत्र हे छोटी गटारे, मोठे नाले यांवाटे ते दहिसर व अन्य नद्यांना जाऊन मिळते. त्यामुळे नद्या या प्रदूषित होत आहेत.
हेही वाचा – Rais Shaikh : मुस्लिम विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव, आमदार रईस शेख यांचा आरोप
दिवसेंदिवस गोठ्यांच्या संख्येत वाढ
दरम्यान, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, कांदिवली, बोरिवली आदी परिसरात रस्त्यालगत, पदपथावर आणि मंदिरांच्या आजूबाजूला अशा अनेक ठिकाणी काही महिला, पुरुष हे गाई, म्हशी उघड्यावर बांधून व्यवसाय करीत आहेत. गाई, वासरे यांना नागरिक पुण्य मिळविण्यासाठी चारा विकत घेऊन ते खाऊ घालतात. त्यामुळे या गाईंच्या नावाखाली व्यवसाय करणार्यांना दररोज चांगलीच कमाई मिळत आहे. तर दुसरीकडे या गाई आणि म्हशी यांच्यापासून त्यांना दूध सुद्धा मिळते. ते दूध विकून त्यांची कमाई होते. कदाचित त्यांच्या कमाईमधूनच संबंधित अधिकारी, पोलीस आदींना चिरीमिरी दिली जात असावी. कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय हा व्यवसाय शक्य नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते.
हेही वाचा – DCM Eknath Shinde : मुंबईकरांचे प्रशस्त घरांचे स्वप्न पूर्ण होणार, काय म्हणाले उपमुख्यमंत्री शिंदे?