मुंबई : थर्टी फर्स्ट साजरी करताना मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करुनही मुंबईकरांनी या नियमांचे सर्रासपणे उल्लघंन केल्याचे दिसून आले. मद्यप्राशन करुन वाहन चालविणार्या 229 जणांवर कारवाई करण्यात आली तर रात्री उशिरापर्यंत 9 हजार 25 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात 2 हजार 810 वाहनचालकांवर विविध कलमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा ड्रिंक अॅण्ड ड्राईव्हचा आकडा वाढला आहे. तसेच शहरात वाहतूक पोलिसांनी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी ठेवल्यामुळे रात्री उशिरा कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. (Drink and Drive Action taken against 229 drunk drivers on the night of 31st)
हेही वाचा – Babanrao Gholap मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थेट मंत्रालयात; उद्धव ठाकरेंना अजून एक धक्का बसणार?
थर्टी फर्स्ट साजरा करताना मुंबईकरांनी पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. मुंबईकरांच्या उत्साहाला कुठेही गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलिसांनी शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पोलिसांचे मार्गदर्शन केले. यावेळी सर्वच अतिरिक्त पोलीस आयुक्त, 22 पोलीस उपायुक्त, 45 सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 450 पोलीस निरीक्षक, 1601 पोलीस अधिकारी, 11 हजार 500 पोलीस कर्मचारी बंदोबस्ताकामी तैनात करण्यात आला होता. मात्र उत्साहाच्या नादात अनेकांनी या नियमांचे सर्रासपणे उल्लघंन केल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आले आहे.
हेही वाचा – Koregaon Bhima विजयस्तंभाच्या स्मारकासाठी शासनाने ‘शंभर’ एकर जमीन संपादीत करावी; आठवलेंची मागणी
31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात अशा घटना घडून अपघात होत असल्याने संपूर्ण शहरात जागोजागी वाहतूक पोलिसांना तैनात करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर बार, पब, हॉटेल मालकांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या होत्या. 31 डिसेंबरला पोलिसांनी 112 ठिकाणी विशेष नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. ही मोहीम पहाटेपर्यंत सुरु होती. यावेळी पोलिसांनी मद्यप्राशन करुन वाहन चालविणार्या 229 मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई केली. तपासणीदरम्यान विना हेल्मेट वाहन चालविणार्या 2 हजार 410, विरुद्ध दिशेने वाहन चालविणार्या 320 आणि बेदरकारपणे वाहन चालविणार्या 80 वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. प्रतिबंधात्मक कारवाईच्य अनुषंगाने मर्मस्थळे, संवेदनशील ठिकाणी अशा 618 ठिकाणी तपासणी करण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणे, गर्दीचे ठिकाणे, समुद्रकिनारे आणि विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.