अंधेरी पूर्व व पश्चिम जोडणारा गोखले पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दुरूस्तीसाठी महापालिकेने 2 वर्षे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, महापालिकेच्या या निर्णयामुळे अंधेरीचा गोखले पूल बंद असल्याचा प्रचंड ताण मुंबई मेट्रो 1वर आला आहे. परिणामी सुरक्षा यंत्रणेवरील भार वाढल्याने अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (Due To Gokhale Bridge Closed Passengers Increased In Metro In Andheri)
अंधेरीचा गोखले पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर अवघ्या 2 दिवसांत प्रवासीसंख्या 28 हजारांनी वाढली आहे. अंधेरी पूर्व व पश्चिम जोडणारा गोखले पूल महापालिकेने बंद केल्यामुळे अंधेरी पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. वाहनचालकांना 2 किमीचा फिरून पूर्वेकडून पश्चिमेला जावे लागत आहे. परिणामी एरव्ही रस्त्याने अंधेरी पश्चिमेकडे जाणाऱ्यांनी आता मेट्रो १ (घाटकोपर-वर्सोवा)चा आधार घेतला आहे. त्यामुळेच तेथील प्रवासीसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी या मार्गावरील प्रवासीसंख्येत 11 हजाराने वाढ झाली आहे. मंगळवारी ही वाढ 17 हजारांवर पोहोचली. येत्या काही दिवसांत ही वाढ २५ हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पूल बंद असल्याने अशा अनेक प्रवाशांनी आता घाटकोपरमार्गे अंधेरी, पश्चिम द्रुतगती मार्ग हे स्थानक गाठण्यास सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच प्रवासीसंख्या वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मेट्रो रेल्वे प्रशासनाने सकाळच्यावेळी घाटकोपर स्थानकावरील सर्व 11 काऊंटर्स सुरू केले आहेत. गोखले पूल बंद असल्याने दुपारी 7 काऊंटर्स सुरू ठेवले जात आहेत. शिवाय, गर्दीच्यावेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत. विशेष बंदूकधारी (डबल बोअर) 2 अतिरिक्त सुरक्षारक्षक घाटकोपर स्थानकावर तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा – मोठी बातमी! अजितदादा पुन्हा नॉट रिचेबल; 4 नोव्हेंबरपासून कुणाच्याही संपर्कात नाहीत