मुंबई – लाडकी बहीण, लाडका शेतकरी, लाडका भाऊ अशा विविध योजना आणि आमिष दाखवून सत्तेत आलेल्या महायुती सरकारला शिक्षक लाडके नाहीत का? असा सवाल उपस्थित होत आहे. राज्यातील जवळपास 50 हजारांहून अधिक शिक्षकांना राज्य सरकारने अधांतरी ठेवले आहे. अंशतः आणि विना अनुदानित राज्यातील 3 हजार शाळांमधील 15 हजार तुकड्यांना वाढीव 20 टक्के अनुदानाचा टप्पा अद्याप देण्यात आलेला नाही. वास्तविक मार्च 2025 पर्यंतच हा वाढीव टप्पा मिळणे अपेक्षित होते. आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस राहिले आहेत. तरीही वाढीव टप्पा मिळालेला नाही. यामुळे राज्यातील 50 हजारांहून अधिक शिक्षक सरकारचे लाडके नाहीत का? असा सवाल उपस्थित होत आहे.
20 ते 80 टप्पावाढीत शिक्षकांची विभागणी
राज्यातील 771 शाळा आणि 383 तुकड्या 11 वर्षांपासून 20 टक्के अनुदानावर आहेत. त्यांना मागील वर्षी वाढीव 20 टक्के अनुदान मिळाले. त्यानंतर या शाळा आणि तुकड्यांना अद्याप वाढीव टप्पा मिळाला नाही. यांना 430 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.
यानंतर राज्यीतील 228 शाळा आणि 2650 तुकड्या 40 टक्क्यांवर आहेत. त्यांना वाढीव 20 टक्क्यांचा टप्पा साधारण 250 कोटी रुपये मिळालेले नाही.
टप्पा अनुदानात 2009 शाळा आणि 4011 तुकड्यांना 60 टक्क्यांवरुन 80 टक्के अनुदान व्हायला पाहिजे होते. त्यासाठीचा 376 कोटींचा निधी देखील मिळाला नाही.
50 हजारांहून अधिक शिक्षक अनुदानाच्या प्रतीक्षेत
माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मार्च 2023 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार 3427 अशंतः आणि विनाअनुदानित शाळांना 15 हजार 571 तुकड्यांना वाढीव टप्पा अनुदानासाठी 1160 कोटी रुपये देणे अपेक्षित होते. मात्र आता 2024-25 या आर्थिक वर्षातही त्यांना अनुदान मिळालेले नाही. राज्यातील 50 हजारांहून अधिक शिक्षक अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. या शिक्षकांचे सेवकसंच अजून तयार झालेले नाही. त्यामुळे शिक्षकांना टप्पावाढ केव्हा मिळणार याची प्रतीक्षा आहे. शिक्षक हे सरकारचे लाडके नाहीत का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
शिक्षण मंत्र्यांची चुप्पी, अर्थमंत्र्यांचे मौन
राज्यातील अंशतः आणि विनाअनुदानीत शाळांची अडवणूक मंत्रालयात नेकमी कुठे होते आहे. नवीन शिक्षण मंत्री दादा भुसे अजून टप्पा अनुदान वाढीवर बोलायला तयार नाहीत. तर अर्थमंत्री अजित पवार यांनीही या प्रश्नावर मौन धारण केले असल्याचा आरोप शिक्षक संघटनांकडून होत आहे. तर शिक्षक आमदार देखील शिक्षकांचे प्रश्न शासनदरबारी मांडण्यात अपयशी होत आहेत का, असा सवाल शिक्षकांकडून विचराला जात आहे. आता राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे, यात शिक्षकांच्या टप्पावाढीचा प्रश्न सुटणार आहे का, याचीच सर्वांना प्रतीक्षा आहे.
हेही वाचा : Budget 2025 : 12 लाख करसवलतीचा फायदा कोणाला? शिवसेना ठाकरे गटाने आकडेवारीसह मांडले गणित