मुंबई : सायन आरओबी पूल, कर्नाक पूल, बेलासिस पूल आणि रे रोड पूल हे ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाल्यामुळे त्यांना पाडण्यात आले आहे. या चार पुलांनंतर आता 125 वर्ष जुना म्हणजेच ब्रिटिश काळातील आणखी एक पूल लवरकच पाडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा 125 वर्ष जुना एलफिन्स्टन पूल पाडण्यात येणार आहे. ज्यामुळे मुंबईकरांचे पुन्हा हाल होणार आहे. मुंबईत आधीच अनेक पूल दुरुस्तीच्या कारणामुळे बंद असल्याने मुंबईकरांना हव्या त्या ठिकाणी जाण्याकरिता विविध मार्गांनी वळसा घालून जावा लागतो. त्यात आता दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या पुलांपैकी एक असलेल्या एलफिन्स्टन पुलाला पाडण्यात आले तर यामुळे मुंबईकरांचे हाल होणार आहेत. (Elphinstone Bridge 125-year-old British-era will be demolished)
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज हा शिवडी-वरळी कनेक्टर प्रकल्पाचा भाग आहे. त्यामुळे एमएमआरडीएने हा पूल पाडून पुन्हा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्रिजचे आयुष्य संपले असून सुरक्षिततेच्यादृष्टीने हा पूल पाडून याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. ज्यामुळे एल्फिन्स्टन पूल पाडल्यानंतर या मार्गावरील वाहतूक टिळक ब्रिज (दादर) आणि करी रोड पुलाच्या दिशेने वळवण्यात येईल. परंतु, या दोन्ही पुलांवरून अवजड वाहनांची वाहतूक नेहमीच सुरू असते. त्यामुळे गर्दीच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी आणखी वाढण्याची शक्यता असून प्रवासाचा वेळ देखील वाढणार आहे. नवीन एल्फिन्स्टन पूल हा सेनापती बापट रोड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडला जोडणारा डबल डेकर उड्डाणपूल असेल, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा… इमारत कोसळली, मातीचा ढिगारा अंगावर पडला, पण टोमॅटोने जीव वाचवला; नेमकं काय घडलं?
एल्फिन्स्टन पुलाच्या पुनर्बांधणीला 19 इमारती अडथळा होत्या. ज्यामुळे या पुलाचे पाडकाम करण्यास विलंब झाला. परंतु, आता वाहतूक विभाग या कामाकरिता ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास तयार आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हा पूल पाडण्यास सुरुवात करण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे. पुनर्बांधणी केलेला एल्फिन्स्टन आरओबी सेनापती बापट रोड ते डॉ. बीआर आंबेडकर रोडला जोडणारा डबल-डेकर फ्लायओव्हर असेल. तर दुसरी शाखा शिवडी येथील एमटीएचएल आणि वरळी येथील वांद्रे-वरळी सी लिंकला थेट कनेक्टिव्हिटी असेल. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवडी-वरळी कनेक्टरचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक किंवा एमटीएचएल) वरील सुमारे 15 टक्के वाहतुकीची सोय होणार आहे. तसेच त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट प्रवेश देखील मिळणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.