Homeक्राइमGangster D. K. Rao : खंडणीच्या गुन्ह्यांत गँगस्टर डी. के रावसह सहा...

Gangster D. K. Rao : खंडणीच्या गुन्ह्यांत गँगस्टर डी. के रावसह सहा जणांना अटक

Subscribe

खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी कुख्यात गँगस्टर डी. के. राव ऊर्फ रविंद्र मल्लेश बोरा याच्यासह सहा जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई (अरूण सावरटकर) : खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी कुख्यात गँगस्टर डी. के. राव ऊर्फ रविंद्र मल्लेश बोरा याच्यासह सहा जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केल्याची माहिती समोर आली आहे. अंधेरीतील एका हॉटेल व्यावसायिकाला सेटलमेंटमध्ये मध्यस्थी करण्यासाठी रावसह त्याच्या सहकार्‍यांनी अडीच कोटीच्या खंडणीसाठी धमकी दिल्याचा आरोप आहे. इतर आरोपीमध्ये अबूबकर अब्दुल्ला सिद्धीकी, इम्रान कलीम शेख, रियाज कलीम शेख, आसिफ सत्तन खान ऊर्फ आसिफ दरबार, जावेद जलालउद्दीन खान आणि हनीफ इस्माईल नाईक ऊर्फ अन्नूभाई यांचा समावेश आहे. अटकेनंतर या सात जणांना किल्ला न्यायालयाने 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Gangster D. K. Rao along with six arrested in extortion case)

मिळालेल्या माहितीनुसार, 74 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार अंधेरीतील मरोळ-मरोशी रोड परिसरात राहत असून त्यांच्या मालकीचे विलेपार्ले येथे एम्पायर नावाचे एक हॉटेल आहे. ते हॉटेल त्यांनी पाच वर्षांसाठी चालविण्याकरिता अब्दुल्ला व त्याचा मुलगा अबूबकर यांना दिला होते. 50 लाख रुपये डिपॉझिट आणि दोन लाख रुपये भाडे या अटीवर त्यांच्यात एक करार झाला होता. मात्र करारानंतर ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना डिपॉझिट आणि भाडे दिले नाही. वारंवार पैशांची मागणी करुनही त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या पत्नीला भाड्याचे पैसे देतो, असे सांगून तिची काही नोटरीवर स्वाक्षरी आणि अंगठा घेतला होता. त्यानंतर या पिता-पूत्रांनी त्यांच्या मालकीचे हॉटेल हडप करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्याविरुद्ध वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात एक सिव्हील केस दाखल केली होती.

हेही वाचा… Bhivandi : भिवंडीत एक हजारहून अधिक तर राज्यात दोन लाख बांगलादेशी

मात्र ही केस दाखल करताना त्यांनी सादर केलेले सर्व दस्तावेज बोगस होते. त्यामुळे त्यांनी अब्दुल्ला आणि अबूबकर यांच्याविरुद्ध वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावरुन त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. त्यातून त्यांनी हॉटेल विक्रीचा निर्णय घेतला होता. मात्र अब्दुल्लाने त्याला विक्रीतून 50 टक्के रक्कम पाहिजे असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे हॉटेल खरेदी-विक्रीच्या व्यवहार थांबला होता. याच दरम्यान त्यांच्यात एक सेटलमेंटची बैठक सहारा हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत डी. के. राव याच्यासह इतर सर्व आरोपी उपस्थित होते. त्याने त्यांच्या समेट घडवून आणताना तक्रारदार व्यावसायिकाकडे अडीच कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. पैसे दिले नाहीतर त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.

यावेळी मुक्तार शेखने या वृद्धाच्या मनात डी. के, राव विषयी भीती घालत म्हटले की, डी. के. राव एक गँगस्टर असून त्याच्याविरुद्ध मर्डरसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याची प्रचंड दहशत असून त्याचे ऐकले नाहीतर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना तसेच त्यांना मदत करणार्‍यांना प्रचंड महागात पडेल. या प्रकाराने ते प्रचंड घाबरले आणि त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. घडलेला प्रकार त्यांनी विमानतळ पोलिसांना सांगून डी. के रावसह इतर आठ जणांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या सर्व आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासानंतर पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाला सोपविण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास हाती येताच पोलिसांनी डी. के. रावसह इतर सहाजणांना गुरुवारी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी अटक केली. याच गुन्ह्यांत सातही आरोपींना दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना गुरुवार, 30 जानेवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.