HomeमहामुंबईमुंबईGoregaon Fire : दिंडोशीत फर्निचर मार्केटमध्ये अग्नितांडव, सुनील प्रभूंकडून न्यायालयीन चौकशीची मागणी

Goregaon Fire : दिंडोशीत फर्निचर मार्केटमध्ये अग्नितांडव, सुनील प्रभूंकडून न्यायालयीन चौकशीची मागणी

Subscribe

गोरेगावमधील दिंडोशी विभागात असलेल्या खडकपाडा परिसारातील फर्निचर मार्केटमध्ये आज शनिवारी (ता. 25 जानेवारी) सकाळी भीषण आग लागली. या परिसरात तिसऱ्यांदा ही आग लागल्याने या घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचे दिंडोशी विधानसभेचे ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्याकडून सांगण्यात आले.

मुंबई : गोरेगावमधील दिंडोशी विभागात असलेल्या खडकपाडा परिसारातील फर्निचर मार्केटमध्ये आज शनिवारी (ता. 25 जानेवारी) सकाळी भीषण आग लागली. सकाळी 10.30-11 या वेळेत लागलेल्या आगीमध्ये मोठी वित्तहानी झाली आहे. आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी या परिसरात असलेल्या चिंधीच्या गोडाऊनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. ही आग लेव्हल – 3 ची असल्याने आणि याच परिसरात तिसऱ्यांदा ही आग लागल्याने या घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे दिंडोशी विधानसभेचे ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्याकडून सांगण्यात आले (Goregaon Fire in Dindoshi Furniture Market, Sunil Prabhu demands judicial inquiry)

दिंडोशीतील फर्निचर मार्केटमध्ये आग लागल्यानंतर या ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली. घटनेच्या तासाभरामध्येच या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होण्यास सुरुवात झाली. या घटनेच्या काही वेळानंतर स्थानिक आमदार सुनील प्रभू आणि खासदार रवींद्र वायकर घटनास्थळी पोहोचले. पण वायकर केवळ पाच मिनिटे घटनेची पाहणी करून निघून गेल्याची माहिती नागरिकांनी दिली. तर, या घटनेबाबत माहिती देताना दिंडोशी विधानसभेचे आमदार सुनील प्रभू म्हणाले की, ही आग मोठी असून लेव्हल – 3 ची ही आग आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या स्थळावर आतापर्यंत तीन वेळा अशा प्रकारची आग लागली आहे. त्यामुळे सततच्या या घटनेमुळे लोकांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. ज्यामुळे या घटनेची निवृत्त न्यायाधीशांच्यामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचे आमदार प्रभू यांनी सांगितले.

हेही वाचा… Maharashtra Weather : राज्याच्या तापमानात होणार मोठे बदल, पाऱ्यात होणार घट

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी सुद्धा याच ठिकाणी आगीचा भडका उडालेला होता. त्यावेळी देखील आगीच्या भक्ष्यस्थानी अनेक गोदामे आली होती. आताही किमान 70 ते 80 गोदामे राख झाली आहेत. या आगीत परिसरातील एक मस्जिद देखील जळाले आहे. चिंध्याची गोदामे, लाकडांची गोदामे व अन्य छोट्या कंपन्या या आगीत राख झाल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. या आगीत करोडो रुपयांची वित्त हानी झाली आहे. आग लागल्यानंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ज्यामुळे अग्निशमनदलाला काम करण्यास अडचण निर्माण होत होती. त्यामुळे पोलिसांनी बघ्यांच्या गर्दीवर सौम्य लाठीचार्ज केला. साधारणतः 30 ते 35 अग्निशमनदलाच्या गाड्यांमधून पाण्याचा मारा या आगीवर करण्यात आला. ज्यानंतर घटनेच्या 4 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले.