HomeमहामुंबईमुंबईGoregaon Fire : दिंडोशीत फर्निचर गोदामाला भीषण आग, अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी

Goregaon Fire : दिंडोशीत फर्निचर गोदामाला भीषण आग, अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी

Subscribe

आज शनिवारी (ता. 25 जानेवार) गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी येथे असलेल्या खडकपाडा परिसरात भीषण आग लागल्याची घटना दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत फर्निचरच्या गोडाऊनसह अन्य काही गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील विविध ठिकाणी विविध कारणांमुळे लागणाऱ्या आगीच्या घटना कमी झालेल्या आहेत. परंतु, आज शनिवारी (ता. 25 जानेवार) गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी येथे असलेल्या खडकपाडा परिसरात भीषण आग लागल्याची घटना दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत फर्निचरच्या गोडाऊनसह अन्य काही गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याची माहिती समोर आली आहे. दाटीवाटीच्या परिसरात ही आग लागल्यामुळे काही वेळातच या आगीने रौद्ररुप धारण केले. या घटनेची माहिती अग्निशमनदलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तर आग लागलेल्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लोक राहात असल्याने ही आग विझवण्याचे मोठे आव्हान अग्निशमन दलासमोर आहे. (Goregaon massive fire broke out at furniture godown in Dindoshi)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगरातील गोरेगाव येथे असलेल्या दिंडोशी विभागातील खडकपाडा परिसरात आज शनिवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग या परिसरात असलेल्या फर्निचरच्या गोदामामध्ये लागल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. परंतु, लाकडाच्या वस्तुंमुळे ही आग पसरत असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत या आगीने रौद्ररुप धारण केले. सध्या अग्निशमन दलाकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागलेल्या भागातील परिसरामध्ये मोठ्याप्रमाणावर झोपडपट्टी आणि फर्निचरची दुकाने असल्याने ही आग आणखी पसरण्याचा धोका आहे. यामुळे आता दिंडोशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून सुरक्षेच्या कारणास्तव आजुबाजूचा परिसर खाली केला जात आहे.

हेही वाचा… ST Fare Hike : मिंधे मंडळाने कोणत्या प्रतापामुळे एसटी डबघाईस आली? ठाकरेंचा थेट सवाल

तासाभरामध्ये 08 ते 10 फर्निचरची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली असून यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. सुदैवाने आतपर्यंत या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. आगीच्या या घटनेनंतर या परिसरातील नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी धावाधाव सुरू केली. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबतचे कोणतेही कारण कळू शकलेले नाही. पण या परिसरात सर्व ठिकाणी लाकडाची गोदामे असल्याने ही आग भडकत असल्याचे सांगण्यात येत आहे. आग रौद्ररप धारण करत असल्याने या आगीचे लोळ दूरपर्यंत दिसू लागले आहेत.