मुंबई : सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल) रेल्वे स्थानक आणि मशिद बंदर रेल्वे स्थानक दरम्यानचा ब्रिटिशकालीन कर्नाक पूल धोकादायक झाल्याने 2022 मध्ये पाडण्यात आला. आता त्याजागी नवीन पुलाच्या उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. (Karnak bridge to open for traffic before monsoon; Second girder work started)
या पुलाचा पहिला लोखंडी गर्डर 19 – 20 ऑक्टोबर 2024 रोजी बसविण्यात आला होता. आता दुसरा गर्डर उभारण्याचे काम सुरू झाले आहे. या लोखंडी गर्डरचे 85 टक्के सुटे भाग पुलाच्या ठिकाणी आले असून गेल्या चार दिवसात दुसरा गर्डर उभारण्याचे 10 टक्के काम पूर्ण झाले आहे.
राज्यात विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाले. पुन्हा एकदा भाजप प्रणित महायुतीचे सरकार सत्तेवर आले. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार सत्तेवर आहे. त्यातच आता मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली आहे. अशातच महायुतीने गेल्या अडीच वर्षांच्या आपल्या सरकारच्या काळात मुंबईत
सुशोभीकरण, स्वच्छता मोहीम, पूल, रस्त्यांची कामे, मेट्रो रेल्वे, गारागाई पाणी प्रकल्प आदी विकासकामे हाती घेतली आहेत. यातील काही विकासकामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. या विकासकामांच्या जोरावरच महायुती मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढविणार असल्याचे सांगितले जाते.
महायुतीकडून मुंबईतील विकासकामांना जास्त महत्त्व देण्यात येत आहे. त्याच दृष्टीने ब्रिटिशकालीन कर्नाक पूल तातडीने उभारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न आणि कामे सुरू आहेत. सदर कर्नाक पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून तो वाहतुकीस खुला करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
कोणत्याही परिस्थितीत सदर पुलाचे काम आगामी पावसाळ्यापूर्वी म्हणजे 5 जून 2025 पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन ठेवले आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यावर या भागातील नागरिकांसाठी आणि वाहन चालकांसाठी खूपच सोयीचे होणार आहे.
हेही वाचा – Maharashtra Winter Session 2024 : मुद्रांक शुल्कासाठी आता 500 रुपये मोजावे लागणार, विधानसभेत विधेयक सादर
Edited by : Ashwini A. Bhatavdekar