– प्रेमानंद बच्छाव
मुंबई : मुंबईच्या पर्यटनाला गती देण्यासाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड.आशिष शेलार यांनी शुक्रवारी येथे दिली. तसेच या उद्यानातील 2 सिंह वर्षभरासाठी त्यांनी दत्तक घेतले आहेत. आशिष शेलार यांनी शुक्रवारी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पाहणी दौरा केला. यावेळी बोलताना शेलार यांनी मुंबईतील पहिल्यावहिल्या बिबट्या सफारीची घोषणा केली. बिबट्यांची सफारी सुरू करण्यासाठी लागणारा निधी वन खात्याकडून आणि जिल्हा नियोजन समितीमधून आम्ही देऊ. याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही शेलार यांनी जिल्हाधिकार्यांना दिले. (Leopard safari start in Sanjay Gandhi national park says ashish shelar)
हेही वाचा : Chhagan Bhujbal : शरद पवारांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली, तेलगी प्रकरणी काय म्हणाले भुजबळ?
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सध्या वाघ आणि सिंहाच्या दोन सफारी उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात बिबट्यांचे सापडलेले बछडे याच उद्यानात संरक्षित करण्यात आले असून त्यांचे पालन करण्यात येत आहे. मात्र पर्यटकांना पाहण्यासाठी त्यांची सफारी उपलब्ध नाही. त्यासाठी सुमारे 30 हेक्टर जागा लागणार असून ही जागा या क्षेत्रात उपलब्ध आहे. तर सफारीसाठी प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती अधिकार्यांनी दिली. या राष्ट्रीय उद्यानाला वर्षभरात 20 लाख पर्यटक भेट देतात. जर बिबट्यांची सफारी उपलब्ध झाली तर पर्यटकांची संख्या वाढेल आणि त्यातून वनक्षेत्राचे उत्पन्न वाढेल, अशी माहिती देऊन मुख्य वनरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन यांनी याबाबत आशिष शेलार यांच्यासमोर सादरीकरण केले.
‘भारत, भारती’ला घेतले दत्तक!
दरम्यान, या उद्यानात ‘भारत आणि भारती’ हे तीन वर्षाचे दोन सिंह नुकतेच 26 जानेवारीला गुजरातमधून आणण्यात आले. त्यांना वर्षभरासाठी आशिष शेलार यांनी दत्तक घेतले असून त्यांच्या पालनपोषणासाठी होणारा खर्च स्वतः शेलार वैयक्तिकरित्या करणार आहेत. तर मानवी वस्तीमध्ये वन्य प्राणी घुसल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी जाणारी 11 जणांची टीम असून या सगळ्यांचा प्राण्यांशी थेट संपर्क येतो. मात्र या सगळ्यांचा सुरक्षा विमा उतरवण्यात आला नसल्याची बाब शेलार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या सर्व कर्मचार्यांचा सुरक्षा विमा उतरवण्याचे निर्देश दिले. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपसंचालक रेवती कुलकर्णी, सहाय्यक वनरक्षक सुधीर सोनवणे, मुख्य सुरक्षा अधिकारी योगेश महाजन आदी उपस्थित होते.