मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्याचे बोलले जात आहे. पण विलेपार्ले येथील सहारा स्टार हॉटेलमध्ये भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या मुलीचा लग्नसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा नेते, मंत्री चंद्रकांत पाटील समोरासमोर आले. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण ठाकरे आणि पाटलांची ही भेट काही पहिल्यांदाच झालेली नाही. याआधी विधानभवनातही दोनदा उद्धव ठाकरे हे चंद्रकांत पाटलांना भेटले आहेत. पण या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. कारण यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेत्याने त्यांच्याचसमोर पाटलांना युतीबाबत प्रश्न विचारला आहे. (Maharashtra Politics In front of Uddhav Thackeray, Milind Narvekar asked Chandrakant Patil about Yuti)
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत आमदार मिलिंद नार्वेकर, माजी खासदार विनायक राऊत हे सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात नवदाम्पत्याला शुभेच्छा देऊन ठाकरे निघाले असताना भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील तिथे पोहोचले. यावेळी भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे समोरासमोर आले. ज्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना मग युती कधी? असा प्रश्न विचारला. यावर चंद्रकांत पाटील यांनी “मी या सुवर्णक्षणाची वाट पाहत आहे,” असे उत्तर दिले. या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. पण यावेळी उद्धव ठाकरे यांनी काहीच म्हटले नाही. त्यांनी केवळ चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांना नमस्कार केला. तर पाटलांनी हसतहसत नमस्कार केला.
हेही वाचा… Sanjay Raut : ठाकरे-भाजपा एकत्र येणार, चंद्रकांत पाटलांशी होतेय जवळीक; नेमकं काय म्हणाले राऊत?
महत्त्वाची बाब म्हणजे, ठाकरे आणि पाटलांची ही भेट काही पहिल्यांदाच झालेली नाही. याआधी विधानभवनातही दोनदा यांची भेट झाली आहे. एका भेटीत तर उद्धव ठाकरेंनी पाटलांच्या दालनात जात त्यांना पेढा भरवला होता. त्यामुळे या भेटीनंतर ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते चंद्रकांत पाटील हे आमचे चांगले नेते आहेत, त्यांनी युतीविषयी व्यक्त केलेल्या भावनांचा मी आदर करतो, असे म्हटल्याने चंद्रकांत पाटलांशी ठाकरे गटाची जवळीक हे पुन्हा एकत्र येण्याचे संकेत तर नाहीत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.