HomeमहामुंबईमुंबईMantralaya News : मंत्रालय परिसरातील झाडावर चढून तरुणाचे आंदोलन, पोलिसांची तारांबळ

Mantralaya News : मंत्रालय परिसरातील झाडावर चढून तरुणाचे आंदोलन, पोलिसांची तारांबळ

Subscribe

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या गिरणानगरमधील सुनील तुकाराम सोनवणे या तरुणाने आज शुक्रवारी (ता. 24 जानेवारी) मंत्रालयासमोर आंदोलन केले. मंत्रालय मुख्य प्रवेशद्वाराबाहेर असलेल्या झाडावर चढून तरुणाने आंदोलन केले.

मुंबई (मारुती मोरे) : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या गिरणानगरमधील सुनील तुकाराम सोनवणे या तरुणाने आज शुक्रवारी (ता. 24 जानेवारी) मंत्रालयासमोर आंदोलन केले. मंत्रालय मुख्य प्रवेशद्वाराबाहेर असलेल्या झाडावर चढून या तरुणाने बॅनर फडकवत नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली. या आंदोलनाने मंत्रालयातील सुरक्षा सांभाळणाऱ्या पोलिसांची काही वेळाकरिता तारांबळ उडाली होती. भ्रष्ट अधिकाऱ्याची तक्रार करून सुद्धा कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने सुनील याने झाडावर चढून आंदोलन केल्याचे सांगण्यात येत आहे. (Mantralay News Young people protest by climbing a tree in Mantralaya area)

मंत्रालयातील प्रवेशावर सध्या निर्बंध आणण्यात आले आहेत. मंत्रालयात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. ज्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी 3.45 वाजताच्या सुमारास सुनील सोनवणे या तरुणाने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर असलेल्या बदामाच्या झाडावर चढला आणि बॅनर फडकावला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी झाडाला चारही बाजून घेरले. काही मिनिटातच बघ्यांची गर्दी वाढली. पोलिसांचा फौजफाटा बघताच सुनील सोनावणे झाडाच्या आणखी वरच्या फांदीवर चढला. तो झाडावरून खाली उडी मारेल या भीतीने पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.

हेही वाचा… Mumbai Auto, Taxi Fare Hike : अखेर रिक्षा, टॅक्सीच्या दरात वाढ; नवे भाडे 01 फेब्रुवारीपासून लागू

अग्निशमन दलाचे जवान येताच त्यांनी झाडाच्या खाली जाळ्या धरल्या. ‘तू खाली ये आम्ही तुझ्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवू’, अशी विनंती पोलीस करीत होते. पण पोलिसांच्या आश्वासनावर त्याचा विश्वास बसत नव्हता. अखेर सुनील झाडावरून खाली उतरला. त्याच्या हातातील निवेदन आणि बॅनर पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याला मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आले. यापूर्वी आंदोलकांनी मंत्रालयात येऊन सुरक्षेसाठी लावलेल्या जाळ्यांवर उड्या मारून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. आता आंदोलक मंत्रालय परिसरातील झाडावर चढून आंदोलन करू लागल्याने सुरक्षा यंत्रणा चक्रावून गेली आहे.

बनावट कागदपत्राच्या आधारे करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी सुनीलती मागणी आहे. यासाठी त्याने स्थानिक पातळीवर तक्रारी केल्या आहेत. पण या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही, असे सुनील सोनवणे याने सांगितले आहे.