मुंबई : ‘मराठी चित्रपट कट्टा’ याचे लोकार्पण आणि दिवंगत अभिनेते ‘रमेश देव’ यांचे नाव दिलेल्या रस्त्याचे नामकरण आज अंधेरी (पश्चिम) येथे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे चिरंजीव अभिनेता अजिंक्य देव, स्थानिक आमदार अमीत साटम, माजी भाजपा नगरसेवक रोहन राठोड आणि मराठी चित्रपट क्षेत्रातील नामवंत कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते. (Marathi film Katta was launched by Ashish Shelar)
मराठी चित्रपट उद्योगाचा सन्मान करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून भाजपाचे माजी नगरसेवक रोहन राठोड यांनी मराठी चित्रपट कट्टाची संकल्पना मांडून विकसित केला आहे. या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना आशिष शेलार म्हणाले की, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते रमेश देव यांची महती खूप आहे. या महान कलाकाराच्या नावाचा मार्ग होणे हे समस्त महाराष्ट्रासाठी आणि कलेवर प्रेम करणाऱ्या सर्वांना आनंद देणारा दिवस आहे. तसेच ‘मराठी चित्रपट कट्टा’च्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांचा सन्मान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आमदार अमित साटम, नगरसेवक रोहन राठोड यांच्यासारख्या प्रत्येकाने आपल्यापरीने केलेले काम महत्त्वपूर्ण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केलेले प्रयत्न आज यशस्वी झाले, त्याचा आम्हाला अभिमान असल्याचेही आशिष शेलार म्हणाले.
हेही वाचा – BMC : डेब्रिज स्वीकारण्याच्या दरात महापालिकेने केली 50 टक्के कपात
यावेळी भाजपाचे स्थानिक आमदार अमित साटम यांनी राष्ट्रीय पातळीवर भारतीय चित्रपट उद्योगाची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठी चित्रपट उद्योग मागे पडण्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, मराठी चित्रपट उद्योग हा भारतीय चित्रपट उद्योगाची जननी आहे. 1913 मध्ये, पहिला भारतीय चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ मराठीत बनवण्यात आला. तेव्हापासून, भारतीय चित्रपट उद्योग वाढला आणि विकसित झाला आहे. मात्र आता मराठी चित्रपट उद्योग मागे पडला आहे. तर दुसरीकडे दक्षिण भारतीय चित्रपटाचा उद्योग खूप पुढे गेला आहे. मराठी चित्रपट क्षेत्राची आजची स्थिती पाहता मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मराठी चित्रपट उद्योग त्याचे गतवैभव नक्कीच परत मिळवेल. मात्र अद्यापही मराठी चित्रपट उद्योगात तंत्रज्ञानाचा पूर्णपणे वापर झालेला नाही. असे असले तरी मराठी चित्रपट उद्योगमध्ये बॉलीवूड आणि हॉलिवूडशी स्पर्धा करण्याची क्षमता आहे. त्यासाठी मंत्री शेलार अत्याधुनिक तंत्रज्ञान आणतील, असा विश्वास आहे. कारण मराठी साहित्य आणि चित्रपट हे समृद्ध आहेत, असा विश्वास अमित साटव व्यक्त केली.