बॉक्सिंग चॅम्पियन एम.सी. मेरी कोमचं नाव जगभरात अभिमानाने घेतलं जातं. बॉक्सिंगसाठी तिने तिचं संपूर्ण आयुष्य देशाला सर्मपित केलं आहे. मेरी कोम चार मुलांची आई आहे .अतिशय खडतर परिस्थितीतून तिने बॉक्सिंगमध्ये नाव कमावलं आहे. सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक मिळवणारी मणिपूरची मेरी कोम आज भारताची शान आहे. तर या ‘सुपर मॉम मेरी कोम’चा खडतर प्रवास कसा होता जाणून घेऊया.
मेरी कोमचा जन्म 1 मार्च 1982 रोजी मणिपूरमधील कंगाथेई या दुर्गम गावात एका गरीब आदिवासी कुटुंबात झाला. मेरी कोम मर्यादित साधनांच्या कुटुंबात वाढली, तिचे आई-वडील भाडेकरू शेतकरी होते. आपल्या मुलीनं बॉक्सिंमध्ये करीअर करावं, असं तिच्या आईवडिलांना वाटत नव्हतं. मेरी कोम शाळेत जाण्यासोबतच शेतात आई-वडिलांना मदत करत होती आणि तिच्या धाकट्या भावंडांची काळजीही घेत होती. मेरी कोमला लहानपणापासूनच खेळांची आवड होती. पण बॉक्सिंगसारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात मेरी कोमला गुप्तपणे प्रशिक्षण घ्यावे लागले, तिचं कुटुंब आणि समाजाकडून पाठिंब्याचा अभाव या गोष्टीला तिला सामोरे जावे लागले.
पदकांची दमदार सुरुवात
1998 मध्ये मणिपूरच्या डिंगको सिंग यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर प्रेरित होऊन मेरी कॉमने बॉक्सिंगमध्ये प्रवेश केला. मेरी कोमने मणिपूरमधील स्थानिक मैती चानू क्लब मध्ये तिच्या बॉक्सिंग कारकिर्दीची सुरुवात केली. तिचे कौशल्य आणि समर्पण लवकरच प्रशिक्षकांच्या लक्षात आले, आणि तिने 2001 मध्ये पहिल्या महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, जिथे तिने 48 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले.
त्यानंतर तिने 2002,2005,2006, 2008 आणि 2010 मध्ये जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदके जिंकली, सहा जागतिक विजेतेपदे जिंकणारी ती पहिली महिला बनली. या क्रिडा प्रकारातील तिच्या वर्चस्वामुळे तिला “मॅग्निफिसंट मेरी” हे टोपणनाव मिळाले. तिने आशियाई चॅम्पियनशिप मध्ये पाच सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक, तसेच 2014 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत आणि 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली. मेरी कोमच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा क्षण म्हणजे 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमधील महिला बॉक्सिंगने पदार्पण केले तो क्षण. ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर बनली आणि फ्लायवेट (51 किलो) वर्गात कांस्यपदक जिंकून इतिहास रचला.
वैवाहिक जीवन
मेरी कोम यांचा विवाह ऑनलर कोम यांच्याशी झाला आहे. ऑनलर कोम हे नागालॅंडचे असून दिल्लीतील नेहरू कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना मेरी कोम यांच्याशी त्यांची भेट झाली. दोघांनी 2005 मध्ये विवाह केला. ओन्लर कोम हे नेहमीच मेरी कोम यांना पाठिंबा देत आले आहेत आणि तिच्या यशामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. लग्नानंतर मेरीने काही काळ खेळाला विराम दिला आणि ती मनापासून संसार करण्यात रमली. मात्र आपल्या वैयक्तिक स्वप्रांचे भान देखील तिने कायम ठेवले. 2007 मध्ये जुळ्या मुलांना आणि 2013 मध्ये तिसऱ्या मुलाला जन्म दिला. मेरी कॉमने 2018 मध्ये एका मुलीला दत्तक घेतले तिचे नाव मेरिया कॉम आहे. तिने आई होऊनही बॉक्सिंग करिअर पुढे सुरू ठेवले आणि इतिहास रचला.
प्रमुख पुरस्कार आणि सन्मान
भारतीय क्रिडा जगतातील मेरी कोमच्या योगदानाची दखल सरकारने घेतली आहे, तिला अनेक प्रतिष्ठित पुरस्कार दिले आहेत. यामध्ये अर्जुन पुरस्कार (2003), राजीव गांधी खेल रत्न (2009), पद्मश्री (2006), पद्मभूषण (2013), आणि पद्मविभूषण (2020) यांचा समावेश आहे. 2016 मध्ये तिची भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृह राज्यसभेत नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
समाजसेवा आणि योगदान
मेरी कॉम यांनी मणिपूरमध्ये बॉक्सिंग अकादमी सुरू केली असून ती नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण देते. ती महिलांच्या हक्कांसाठी आणि क्रीडा क्षेत्राच्या सुधारण्यासाठी सक्रिय आहे.
2014 साली मेरी कोम यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने या चित्रपटात मेरी कोमची भूमिका साकारली होती. या चित्रपटात मेरी कोमच्या जीवनाचा खडतर प्रवास दाखविण्यात आला होता.
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
मेरी कोम ही आपल्या 40 वर्षाच्या आयुष्यात आणि 25 वर्षाच्या करियर कारकिर्दीत सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप किताब मिळवणारी ही जगातील एकमेव बॉक्सर महिला आहे. मेरी कोमला तिच्या यशाबद्दल देशभरात आदर आणि प्रतिष्ठा मिळाली आहे, तिच्या कामगिरीने केवळ भारताला गौरव मिळवून दिला नाही तर सामाजिक मानदंडांना आव्हान दिले आणि ती एक बॉक्सिंगमध्ये करियर करू पाहणाऱ्या अनेक महिला खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहे.