मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मनसेवर लोकसभा निवडणुकीपासून भूमिका बदलाचा आरोप होत आहे. कार्यकर्त्यांमध्ये पक्षाच्या भूमिकेबद्दल स्पष्टता असली पाहिजे, असे सांगत राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष, शरद पवार आणि शिवसेना यांनीही परिस्थितीनुसार निर्णय घेतले आहेत. मात्र त्यांनी निर्णय घेतले की ते परिस्थितीनुरुप निर्णय ठरता आणि राज ठाकरेने निर्णय घेतला की त्याला भूमिका बदलाचा शिक्का मारला जातो. त्यांनी केले ते प्रेम आणि आम्ही केलं की तो बलात्कार असे ते म्हणाले.
भाजपने अब्दुला, महेबुबांसोबत युती केली
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपने कोणा-कोणासोबत युती केली याचा पाढा यावेळी वाचला. कलम 370 ला विरोध करणाऱ्या फारुख अब्दुल्लांसोबत त्यांनी एनडीएचे सरकार स्थापन केले. दहशतवाद्यांना सोडून देणाऱ्या सईद यांच्या मुलीसोबत काश्मीरमध्ये भाजपने सरकार स्थापन केले. महाराष्ट्रात शरद पवारांसोबत जनसंघ होता, याचीही आठवण राज ठाकरेंनी करुन दिली.
भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि नंतर पक्षात घेतले
हेमंत बिस्वा सर्मा हे दुसऱ्या पक्षात होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे मूर्तीमंत उदाहरण असल्याचे भाजपने म्हटले होते. ममता बॅनर्जीच्या पक्षातील मुकुल रॉय यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्यांना भाजपने पक्षात घेतले. अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. आत टाकू म्हटले. हे त्यांना मंत्रिमंडळात टाकणार हे आम्हाला माहित नव्हते. अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळ्याचा आरोप आहे. त्याचे व्हाईट पेपर काढण्याची धमकी देण्यात आली. आठच दिवसांत ते भाजपमध्ये आले आणि त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. हे सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांना माहित असले पाहिजे. गेल्या साठ – सत्तर वर्षांमध्ये भारताच्या राजकारणात काय-काय झालं, हे मनसेच्या कार्यकर्त्यांना माहित असले पाहिजे. मनसेविरोधात अफवा पसरवला जातो तेव्हा कुठल्या पक्षाने काय-काय गोष्टी केल्या या तुम्हाला माहित असल्या पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले.
राधाकृष्ण विखे पाटील आधी काँग्रेसमध्ये होते, नंतर भाजपमध्ये गेले आता राज्यात मंत्री आहेत. हर्षवर्धन पाटील काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले तेव्हा म्हणाले होते की आता शांत झोप लागते, ते आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. नारायण राणे, बबनराव पाचपुते, पद्मसिंह पाटील, विजय सिंह मोहिते पाटील यांच्यावर आरोप झाले, हे सर्व आज भाजपसोबत गेले. यांना नाही कोणी म्हणालं तुम्ही भूमिका बदलली. देवेंद्र फडणवीसांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते अनेक लोक आता त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. यांना कोणी विचारत नाही, भूमिका का बदलली, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
त्यांनी केलं की प्रेम…
शिवसेनेच्या स्थापनेपासून उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीच्या प्रयोगापर्यंतची उदाहरणे राज ठाकरे यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की, “शिवसेनेचा जन्म 1966 मध्ये झाला. त्यांनी पहिली निवडणूक प्रजा समाजवादी पक्षासोबत लढवली. त्यानंतर मुस्लिम लीग सोबत युतीही केली होती. 1975- 77 साली काँग्रेसला पाठिंबा दिला. 1980 मध्ये काँग्रेससोबतही युती केली. नंतर भाजपसोबत गेले. त्यात्या वेळी जी परिस्थिती असते त्यानुसार पक्ष निर्णय घेत असतात. त्यांनी निर्णय घेतला की त्याला परिस्थितीनुसार घेतलेला निर्णय म्हटले जाते. यांचं सालं एक बरं आहे. त्यांनी केलं तर प्रेम आणि आम्ही केला तर बलात्कार” असा निशाणा राज ठाकरे यांनी विरोधकांवर साधला.
हेही वाचा : Raj Thackeray : टॅक्स भरला, विषय संपला; ईडीच्या नोटीसीबाबत राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा