Homeमनोरंजनदिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या 'नाच गं घुमा'मध्ये झळकणार मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव

दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या ‘नाच गं घुमा’मध्ये झळकणार मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव

Subscribe

मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई , तृप्ती पाटील आणि स्वप्नील जोशी यांची निर्मिती असलेला ‘नाच गं घुमा’ होणार १ मे रोजी प्रदर्शित

‘स्त्री हा निसर्गाचा मास्टरपीस आहे…’, ‘बायकांना जग चालवायला दिले तर युद्ध होणार नाही, फक्त देश एकमेकांशी न बोलणारे असतील…’, अशा अनेक टीका-टोमणे-टिप्पण्यांना सामोरी जाणारी स्त्रीशक्ती अलीकडे रुपेरी पडद्यावर धमाल करते आहे. त्याचाच पुनःप्रत्यय ‘नाच गं घुमा’च्या निमित्ताने रसिकांना नव्याने येणार आहे. बहुप्रतीक्षित अशा या चित्रपटाच्या चित्रिकरणाला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सुरुवात झाली असून चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत ही नावेच केवळ ‘नाच गं घुमा’ नेमका काय व कसा असेल, याची कल्पना देवून जातात. या नावांवरून चित्रपट महिलांची एक कथा असेल याचा अंदाज येतोच पण ही नावे एवढी उत्तुंग आहेत की, काहीतरी भन्नाट आपल्यासमोर येणार याची खूणगाठ प्रेक्षक बांधून टाकतो. या नावांच्या जोडीला मग स्वप्नील जोशी आणि परेश मोकाशी यांची नावे जोडली की दर्जेदार निर्मितीची हमी मिळते. हे दोघे चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत.

मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून या दोघांसह शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील आणि स्वप्नील जोशी चित्रपटाचे निर्माते आहेत. मुक्ता, नम्रता, सुकन्या, सुप्रिया यांच्या अभिनयाने ही कथा बहरणार असल्याने अर्थातच मनोरंजनाची पूर्ण हमी ‘नाच गं घुमा’ देणार यात शंका नाही.

“महिलांच्या अवतीभवती घडणाऱ्या आणि त्यांच्याशी संबंधित अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी यात गुंफल्या गेल्या आहेत. महिलांच्या संबधातील गोष्टी साकारताना स्त्रीत्त्वाचा एक वेगळा पैलू अलगद समोर येतो आणि तिच्या बुद्धीमत्ता-भावनेच्या अचूक मिश्रणावर प्रकाश पडतो. बायकांच्या विविध स्वभाव वैशिष्ट्यांवर आणि त्यांवर आधारित गमती-जमतींवर चित्रपट बेतला आहे. चित्रपटाच्या मुहूर्ताच्यावेळी चित्रपटातील सर्वजण एकत्र आले आणि एक झकास भट्टी जमून आल्याची पोचपावतीच मिळाली,” निर्माता स्वप्नील जोशी म्हणाले.

चित्रपटाची घोषणा ऑक्टोबरमध्ये नवरात्रीत झाली आणि त्यानंतर एक छोटेखानी शीर्षक प्रकट व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला. त्याद्वारे या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचा मुहूर्त १५ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या निमित्ताने करण्यात आला.

चित्रपट कसा आकाराला आला हे सांगताना मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “सहज म्हणून आम्ही शर्मिष्ठा, तेजस आणि स्वप्नील यांना या कथेच्या वाचनासाठी बोलावले. हसून हसून हैराण झाले ते. स्वप्नीलनी विचारले, ‘मी काय करू? गोष्ट बायकांची आहे तर मी साडी नेसून रोल करतो.’ परेश मोकाशी म्हणाले, ‘नाही. तू काहीच करायचे नाही. तुला यात रोल नाही.’ त्यावर स्वप्नील जोशी म्हणाले, ‘मी निर्मात्याचा रोल करतो.’ त्यांची व्यवसायातील पार्टनर तृप्ती यांनी लगेच आर्थिक भाग उचलायचे कबूल करून त्यात उडी मारली. नव्याने मालिकांच्या निर्मितीत उतरलेले शर्मिष्ठा आणि तेजस मागे हटणार नव्हते. सहज वाचनासाठी जमलेला हा संच, तितक्याच सहजपणे आणि झटक्यात निर्मात्यांचा समूह बनला.”

मधुगंधा, परेश, स्वप्नील या मंडळींचा नुकताच आलेला ‘वाळवी’ चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गाजला आणि लोकप्रिय झाला. हरीश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, चि सौ कां, आत्मपॅम्प्लेट, वाळवी यांसारख्या दर्जेदार व गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केलेल्या टीमची ही पुढील प्रस्तुती आहे.

“स्त्री या निसर्गाचा मास्टरपीस आहे, असे म्हणतात. स्त्री-पुरुषांच्या मेंदूचे वायरिंगच वेगळे असते. बाई कळत नाही, असे म्हटले जाते पण ते म्हणणारे पुरुष असतात. बाई बाईला बरोबर कळते…. आजची महिला ही बुद्धी आणि भावनेचे एक अचूक मिश्रण असते. बायकांना जग चालवायला दिले तर युद्ध होणार नाही, पण ते देश मात्र एकमेकांशी बोलणार नाहीत…अशा अनेक गमती-जमती स्त्रीत्त्वभोवती फिरतात. त्याच या चित्रपटात असणार आहेत,” मधुगंधा कुलकर्णी म्हणतात.