मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ होणार असल्याची बातमी समोर येत होती. परंतु, आता या दरवाढीवर शिक्कामोर्तब झाला असून 01 फेब्रुवारीपासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण अर्थात एमएमआरटीएची शुक्रवारी याबाबतची बैठक पार पडली. या बैठकीत टॅक्सी आणि ऑटो रिक्षांच्या भाड्यात वाढ करण्याची मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात तीन रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र महिलांना बसचे निम्म्या दरात तिकिटं मिळेल, असे महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच वृद्धांसाठी मोफत प्रवासाची तरतूद सुरूच राहणार आहे. (Mumbai Auto, Taxi Fare Hike from 01 February 2025)
एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षात एसटीच्या तिकीट दरात कोणतीही वाढ केली नव्हती. मात्र, आता एसटीचा प्रवास महागला आहे. एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आल्याचं काही दिवसांपूर्वी सांगितलं जात होतं. यानंतर अखेर आता एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यासंदर्भातील माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. त्यामागोमाग, मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने सुद्धा टॅक्सी आणि रिक्षाच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे आता टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांना कमीत-कमी 31 रुपये, तर रिक्षाच्या प्रवासासाठी कमीत-कमी 26 रुपये द्यावे लागतील.
हेही वाचा… Mumbai Crime : आजाराचा फायदा घेत 78 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षीय तरुणाला अटक
दीड किलोमीटर अंतरासाठी मुंबईतील रस्त्यावर धावणाऱ्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे किमान भाडे हे 28 रुपये आहे. पण आता भाडेवाढीमुळे ते भाडे 31 रुपये असेल. तर दीड किलोमीटर अंतरासाठी ऑटो रिक्षाचे भाडे आता 23 रुपयांऐवजी 26 रुपये असणार आहे. 01 फेब्रुवारी 2025 पासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. ज्यामुळे आता सार्वजनिक वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला 01 तारखेपासून कात्री लागणार आहे. ज्याच्या परिणाम दैनंदिन जीवनावर होणार असल्याचे बोलले जात आहे. तर रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ ही 3 रुपये प्रति किलोमीटर होणार आहे, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.