मुंबई : महाराष्ट्रात प्रवास सुखकर होण्यासाठी परिवहन विभागाने गेल्या काही काळात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अशामध्ये आता परिवहन विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास स्वस्तात होणार आहे. ओला, उबेरसारखेच मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार आहे. तसेच, पुढील दोन महिन्यात रॅपिडोसारख्या बाईक सर्विस सुरू होणार आहेत. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकून पडणाऱ्या प्रवाशांसाठी आता आणखी एक पर्याय निर्माण होणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवाशी अधिक जलद आणि स्वस्तात होणार असल्याचे सांगितले जात आहे. (Mumbai Bike Taxi services will start within two months)
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत प्रवास करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मुंबई लोकल, बेस्ट बस, मुंबई मेट्रो, टॅक्सी, रिक्षा असे पर्याय असतानाही मुंबईकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यासाठी मुंबईत बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार असून ही सेवा सुरू करताना महिला प्रवाशांची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. येत्या दोन महिन्यांत मुंबईत बाईक टॅक्सी सुरू होणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. ते म्हणाले की, “महिलांची सुरक्षा लक्षात घेता बाईक चालकाच्या मागे बसणाऱ्या महिला प्रवाशी यांच्यात अंतर असावे, तसेच बाईक चालक आणि महिला प्रवाशी यांच्यामध्ये विभाजक (partition) बसवणे बंधनकारक असणार आहे.” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
🗓 २८ जानेवारी २०२५ | 📍मंत्रालय, मुंबई
“परिवहन व्यवस्थेत आधुनिकतेची वाटचाल!
महाराष्ट्रातील परिवहन यंत्रणा अधिक सक्षम, सुसज्ज आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. वॉटर टॅक्सी, रोप वे, पार्किंग प्लाझा यांसारख्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी या बैठकीत… pic.twitter.com/1oEfqcS784
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) January 29, 2025
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले आहेत की, “ज्याप्रकारे पावसाळ्यामध्ये स्विगी किंवा इतर फूड डिलिव्हरी करणाऱ्या एजन्सीकडे एक फोल्डिंग असते. तशाच प्रकारे पावसाळ्यामध्ये प्रवासी किंवा चालकाला पाऊस लागणार नाही, अशी व्यवस्था करण्यात यावी,” अशा सूचनादेखील त्यांच्याकडून करण्यात आल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, बाईक टॅक्सीमध्ये प्रती किलोमीटर 3 रुपये इतके भाडे आकारले जाणार आहे. यामुळे बाईक टॅक्सी सुरू झाल्यास मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल, तसेच मुंबईकरांच्या पैशांचीदेखील बचत होणार आहे. नुकतेच, राज्यातील परिवहन यंत्रणा अधिक सक्षम, सुसज्ज आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. वॉटर टॅक्सी, रोप वे, पार्किंग प्लाझा यांसारख्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.