मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला तसेच पी. डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील महत्वाचा टप्पा असलेला 550 मेट्रिक टन वजनी उत्तर बाजूचा गर्डर शुक्रवारी (31 जानेवारी) संपूर्णपणे बसवण्यात महापालिका आणि रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. गेल्या रविवारपासून (25 जानेवारी) हा गर्डर बसवण्यासाठी रेल्वेकडून मेगा ब्लॉक घेणे, मध्यरात्रीच्या वेळेत काम करणे, एका बाजूचा जॅक निघाला असताना आणि हा गर्डर बसविताना एक कर्मचारी जखमी होणे तसेच रेल्वेची वाहतूक सुरळीत राखणे अशा कठीण परिस्थितीत सदर गर्डर बसविण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे. आता उर्वरित काम पावसाळ्याआधी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यासमोर आहे. (Mumbai Carnac Bridge Reconstruction Nears Completion Set to Open by June 2025)
हेही वाचा : Five Day Banking Week : बँकेचा पाच दिवसांचा आठवडा? बजेटमध्ये घोषणा होण्याची शक्यता
पावसाळा सुरू होण्याआधीच सदर रेल्वे पुलाचे काम पूर्ण करून पुलावरील वाहतूक सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी 31 जानेवारी रोजी रात्री 1.30 ते मध्यरात्री 4 या अडीच तासांच्या कालावधीत वाहतूक आणि वीज पुरवठा या दोन्ही घटकांमध्ये घेतलेल्या विशेष खंड (स्पेशल ब्लॉक) दरम्यान गर्डर सरकविण्याची आव्हानात्मक कार्यवाही पूर्ण करण्यात आली. वास्तविक, पुलाचा गर्डर सरकविण्याचे काम 26 जानेवारी रोजी हाती घेण्यात आले होते. पण गर्डर सरकवण्याची कार्यवाही पूर्ण होण्यास 12 मीटर अंतर शिल्लक असताना काही तांत्रिक अडचणींमुळे व्यत्यय आला होता. महापालिका आणि मध्य रेल्वे प्रशासन यांनी समन्वय साधून, तांत्रिक अडचणींवर मात करत सदर गर्डर सरकविण्याची कार्यवाही शुक्रवारी पूर्ण केली.
गर्डर सरकवण्याचे हे काम तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक होते. त्यासाठी विशेष तज्ञ मे राईट्स यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष ब्लॉक घेऊन गर्डर सरकविण्याची कार्यवाही पूर्णत्वास नेण्यासाठी मुंबई महापालिकेला विशेष सहकार्य केले. मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली पूल विभागाने मध्य रेल्वे प्रशासनासह योग्य समन्वय साधून ही कार्यवाही पूर्ण केली आहे. प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, उपप्रमुख अभियंता (पूल) शहर राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी योग्य नियोजन करून ही कामगिरी केली आहे. आता, मध्य रेल्वेच्या ‘ब्लॉक’ नंतर लोखंडी गर्डर बाबतची पुढील कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.
हेही वाचा : Mumbai : महिला तक्रार निवारण समिती बंधनकारक, जिल्हाधिकारी संजय यादव यांची माहिती
दक्षिण मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे मुंबई महापालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले होते. या प्रकल्पाच्या अंतर्गत 550 मेट्रिक टन वजनाची उत्तर बाजूची लोखंडी गर्डर महापालिका हद्दीत 9.30 मीटरपर्यंत चाचणी स्वरूपात सरकविण्याची कार्यवाही 14 जानेवारी 2025 रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर, मध्य रेल्वे प्रशासनाच्या 25 जानेवारी रोजी मध्यरात्री 11.30 ते 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता या ब्लॉकदरम्यान गर्डर 58 मीटर सरकविण्यात आला. दरम्यान, गर्डर सरकवण्याची कार्यवाही पूर्ण होण्यास 12 मीटर अंतर बाकी असताना तांत्रिक अडचणी आल्याने या कार्यवाहीमध्ये व्यत्यय आला. त्यावर मात करत अखेर गर्डर सरकविण्याची कार्यवाही शुक्रवारी 31 जानेवारी रोजी पूर्ण करण्यात महापालिका प्रशासनाला यश आले.
जूनपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट
मध्य रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार व मध्य रेल्वेने निर्देश केल्याप्रमाणे मेसर्स राईट्स लिमिटेड यांच्या तांत्रिक पर्यवेक्षणाखाली हे कामकाज पूर्ण करण्यात आले आहे. आता, मध्य रेल्वेने ‘ब्लॉक’ घेतल्यानंतर लोखंडी गर्डरबाबतची पुढील कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. रेल्वे मार्गावर गर्डर स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पुढील कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करून टप्पानिहाय किती कालावधी लागेल, याची निश्चिती महापालिकेच्या पूल विभागामार्फत करण्यात आली आहे. त्यानुसार, पूर्व आणि पश्चिम दिशेच्या पोहोच मार्गासाठी (ऍप्रोच रोड) खांब पाया बांधणी (पाईल फौंडेशन) पूर्ण करणे, पोहोच रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि भार चाचणी (लोड टेस्ट) करणे आदी कामांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या नियोजित वेळापत्रकानुसार, अपेक्षित कार्यवाही पूर्ण झाल्यास जून २०२५ पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीस खुला करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ऍण्टी क्रॅश बॅरिअर्स, वीजेचे खांब उभारण्याकामी होणारा कालापव्यय टाळण्यासाठी ही कामे देखील समांतरपणे पूर्ण केली जाणार आहेत.