मुंबई (अरुण सावरटकर) : गुंतवणूकीसाठी घेतलेल्या सुमारे दोन कोटी रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जाकीर नसीम खान आणि आयेशा जाकीर खान अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाने आतापर्यंत 33 गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहणारे तक्रारदार पत्रकार असून त्यांचा स्वतःचा यूट्यूब चॅनेल आहे. (Mumbai Crime Husband and wife cheated 33 investors, embezzled two crores)
मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षापूर्वी तक्रारदार यांची जाकीरशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान त्याने त्याचा फॉरेक्स ट्रेडिंगचा व्यवसाय असल्याचे सांगितले. मुंबईसह दुबईत त्याचे कार्यालय असून त्याची पत्नी आयेशा तिला मदत करत असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे अनेकांनी फॉरेक्स ट्रेडिंगसाठी गुंतवणूक केली असून त्यात त्यांना चांगला परतावा मिळाला आहे. त्यामुळे त्याने त्यांना त्याच्याकडे गुंतवणूकीचा सल्ला दिला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून त्याने ऑक्टोबर 2023 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत सुमारे साडेतेरा लाखांची गुंतवणूक केली होती. त्यांच्यासह इतर 32 जणांनी सुद्धा त्यांच्याकडे दोन कोटी नऊ लाखांची गुंतवणूक केली होती.
हेही वाचा… Kalyan : Thane : Crime : गुंड, दादागिरी करणार्यांवर पोलिसांचा बडगा
या सर्वांना काही महिने परताव्याची रक्कम मिळाली होती. मात्र नंतर ही रक्कम येणे बंद झाले होते. तसेच जाकीरने दिलेले ऍप अचानक बंद झाले होते. त्यात त्यांच्या गुंतवणूकीसह परताव्याबाबत माहिती येणे बंद झाले होते. याबाबत जाकीर व त्याची पत्नी आयेशाकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे सर्व गुंतवणूदारांचा डाटा असून सर्वांना पैसे मिळतील असे सांगितले. मात्र काही महिन्यानंतर त्यांनी त्यांना प्रतिसाद देणे बंद केले. त्यांनी त्यांचे मोबाईल बंद करून पलायन केले होते. हा प्रकार निदर्शनास येताच तक्रारदारासह इतरांनी शिवाजीनगर पोलिसांत धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी जाकीर खान आणि त्याची पत्नी आयेशा खान यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.