मुंबई : मुंबईतील मध्य रेल्वेचे प्रमुख स्थानक सीएसटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील एसी टॉयलेटमधून दीड लाख रुपयांच्या सामानाची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या या स्थानकावर सलग दोन दिवस सार्वजनिक शौचालयात चोरी झाली आणि याचा थांगपत्ताही कोणाला लागला नाही. रेल्वे अधिकाऱ्यांना जेव्हा हा प्रकार समजला तेव्हा त्यांनी जाऊन टॉयलेट-बाथरूमची पाहणी केली आणि ते सर्व हैराण झाले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) हे मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. उपनगरीय गाड्यांसोबतच लांब पल्ल्याच्या गाड्या देखील येथून सुटतात. या सोबतच कामकाजाच्या दृष्टीने देखील हे स्टेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि विभागीय कार्यालय देखील येथेच आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : “भाजपाला 400 जागा जिंकण्याची खात्री मग…”, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना सवाल
या स्थानकाचे महत्त्व आणि येथे येणारी गर्दी पाहता स्थानकात अद्ययावत सोयी असाव्यात यासाठी रेल्वे प्रशासनाने येथे चांगल्या सोयी – सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. येथील उपनगरीय रेल्वे वाहतूकीच्या परिसरात महिन्याभरापूर्वी मध्य रेल्वेकडून वातानुकूलित टॉयलेट तयार करण्यात आले. या टॉयलेटमध्ये दुर्गंधी येऊ नये म्हणू्न वेगवेगळ्या सुविधांचा वापर करण्यात आला आहे. याच टॉयलेटमध्ये चोरी झाली आहे. आणि चोरीच्या घटनेनंतर हे टॉयलेट तूर्तास तरी बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
केवळ महिन्याभरापूर्वी सुरु करण्यात आलेल्या एसी टॉयलेटमधून तब्बल दीड लाख रुपयांचे सामान चोरीला गेले. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार यात सहभागी असलेल्या अन्य लोकांचा शोध सुरू आहे. या घटनेची नोंद सीएसएमटी जीआरपीमध्ये नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, टॉयलेटच्या आत सीसीटीव्ही लावता येत नाही. पण अशा प्रकारे चोरी होत असताना जर कोणी पाहिले असेल तर ते यासंदर्भात माहिती देऊ शकतात, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा – RBI Credit Policy : रेपो रेट ‘जैसे थे’; आरबीआयकडून कर्जदारांना दिलासा
दरम्यान, केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांनाच या खोलीत प्रवेश असल्याने हे काम कुण्या माहितगाराचं असल्याचा मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. जेट स्प्रे, टॉयलेट सीट कव्हर, टॅप, बॉटल होल्डर आणि स्टॉपकॉक्स अशा सुमारे ७० गोष्टींची चोरी झाली आहे. या चोरीत कंत्राटी कामगारांचा समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही. टॉयलेटमध्ये CCTV लावण्यास बंदी असल्याने चोरांचा शोध घेणे अवघड असल्याचेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.
जेट स्प्रेची किंमत प्रत्येकी १६०० रुपये असून चोरलेल्या १२ वस्तूंची किंमत १९,२०० रुपये असल्याची माहिती आहे. याशिवाय २८,७१६ रुपये किमतीची ६ नाणीही गायब आहेत. विशेष बाब म्हणजे ४ जानेवारीलाच एसी टॉयलेट प्रवाशांसाठी खुले करण्यात आले.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी हे टॉयलेट तयार झाल्यानंतर त्याची पाहणी केली होती. CSMT स्थानकावर प्रवाशांची संख्या जास्त असल्याने त्याचा वापर सर्वाधिक केला जातो. यादव यांनी या टॉयलटेच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले होते.