Homeदेश-विदेशMumbai Dabbawala : केरळात गिरवले जाणार मुंबईच्या डब्बेवाल्यांचे धडे; वाचा सविस्तर

Mumbai Dabbawala : केरळात गिरवले जाणार मुंबईच्या डब्बेवाल्यांचे धडे; वाचा सविस्तर

Subscribe

मुंबईतील प्रसिद्ध डब्बेवाले यांची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचली हे सर्वश्रुत आहे. पण याच डब्बेवाल्यांची गोष्ट आता पाठ्यपुस्तकातही वाचायला मिळणार आहे. केरळ सरकारने याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : मुंबईतील डब्बेवाल्यांची कीर्ती आता केरळमधील घराघरामध्ये पोहोचणार आहे. कारण, केरळ सरकारने त्यांच्या शालेय अभ्यासक्रमात मुंबईच्या डब्बेवाल्यांची माहिती देण्याचा निर्णय घेतला आहे. केरळच्या पाठ्यपुस्तकामधील पाच पानांच्या धड्यामध्ये इयत्ता 9वी च्या इंग्रजी अभ्यासक्रमात डब्बावाल्यांच्या गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे. ‘द सागा ऑफ द टिफिन कॅरिअर’ नावाचा धडा ह्युग आणि कॉलीन गँट्झर यांनी लिहिला आहे. (Mumbai Dabbawala story and information now include in keralas textbook)

हेही वाचा : Ajit Pawar Pune: अजित दादांची दिसून आली कार्यतत्परता…अपघातग्रस्तांची अशी केली मदत 

केरळ स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एससीईआरटी) 2024 च्या नवीन अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मुंबईच्या ‘डब्बावाल्याची प्रेरणादायी गोष्टीचा समावेश केला आहे. यामध्ये मुंबईची डब्बावाल्यांची सेवा कशी सुरू झाली? याचा उल्लेख करण्यात आला आहे. मुंबईतील डब्बेवाल्यांचा व्यवसाय 130 वर्षांहून अधिक जुना असून 1890मध्ये याची सुरुवात झाली होती. मुंबईचे डब्बेवाले हे मुंबईतील ऑफिस कर्मचाऱ्यांना जेवणाचे डब्बे पोहचवण्याचे काम करतात. त्यांच्या वितरण प्रणालीचे आणि व्यवस्थापनाचे फक्त देशातच नव्हे तर सातासमुद्रापारही कौतुक केले जाते. मुंबईमध्ये डब्बेवाल्यांची संख्या ही ५ हजारहून अधिक आहे. त्यांच्याकडून दर दिवशी दोन लाखांहून अधिक डब्बे पोहचवले जातात. मुंबईच्या डब्बे वाल्यांचा पोशाखही लोकांना आकर्षित करतो. पांढरा रंगाचा कुर्ता आणि पायजमा, डोक्यावर गांधी टोपी, आणि पायात कोल्हापुरी चप्पल असा त्यांचा गणवेश असतो.

मुंबईच्या डब्बेवाल्यांनी जागतिक स्तरावर बिझनेस स्कूल आणि संशोधकांचेही लक्ष वेधून घेत घेतले आहे. अनेक चित्रपट, माहितीपट, पुस्तके आणि संशोधनामुळे त्यांचे काम हे अधिक प्रसिद्ध झाले. एवढेच नव्हे तर त्यांच्यावरून एक कॉमिक बुकसुद्धा आहे. ते मुंबईतील कलाकार अभिजीत किणी यांनी 2019मध्ये बनवले होते. दरम्यान, केरळच्या शालेय अभ्यासक्रमात त्यांचा समावेश केल्याची माहिती मिळाल्यानंतर डब्बावाल्यांनी केरळच्या शिक्षण विभागाला मेल करत त्यांचे आभार मानले आहे.


Edited by Abhijeet Jadhav