मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील विविध ठिकाणी विविध कारणांमुळे लागणाऱ्या आगीच्या घटना कमी झालेल्या आहेत. परंतु, आता आठवड्याभरात दुसऱ्यांदा आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यात शनिवारी (ता. 25 जानेवारी) उपनगरातील गोरेगाव येथे असलेल्या दिंडोशी भागातील खडकपाडा परिसरात असलेल्या फर्निचर मार्केटमध्ये अग्नितांडव पाहायला मिळाले. या घटनेनंतर आज शनिवारी (ता. 01 फेब्रुवारी) कुर्ल्यात सिलिंडर स्फोटामुळे आग लागली आहे. या आगीच्या भक्ष्यस्थानी चार दुकाने आली आहेत. या घटनेमुळे परिसरात दूरवरून आगीचे लोळ आकाशात जात असल्याचे पाहायला मिळत आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Mumbai Fire incidents in Kurla Four shops burnt down)
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिम एलबीएस मार्गावर असलेल्या शिवाजी कुटीर परिसरात सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली. या परिसरात मोठ्या प्रमाणात विविध कारखाने आणि गोदामे आहेत. यातील एका गोदामात सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. त्यानंतर काहीच वेळात ही आग वाढत गेल्याने या आगीमध्ये तीन ते चार दुकाने जळून खाक झाली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दोन दिवसांमध्ये दुसऱ्यांदा याच परिसरात आगीची घटना घडली आहे. दोन दिवसात दुसऱ्यांदा आग लागल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर या घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. ही आग वाढू नये, याकरिता एकूण सहा अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने या आगीवर काही तासांमध्ये नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
गोरेगावात लागलेली फर्निचर मार्केटला आग…
आठ दिवसांपूर्वी गोरेगाव पूर्व येथील दिंडोशी भागात असलेल्या खडकपाडा परिसरातील फर्निचर मार्केटला आग लागली होती. या घटनेत साधारणतः 100 पेक्षा अधिक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी गेली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली होती. सध्या घडणाऱ्या आगीच्या घटना या कारखाना परिसरात घडत असल्याने याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तर आज लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाने मोठ्या शर्थीने नियंत्रण मिळवले आहे.