HomeमहामुंबईमुंबईMumbai MMR : एमएमआर रिजनमधील पाण्याचा प्रश्न पुढील 2-3 वर्षांत मार्गी लागेल...

Mumbai MMR : एमएमआर रिजनमधील पाण्याचा प्रश्न पुढील 2-3 वर्षांत मार्गी लागेल – मंत्री गिरीश महाजन

Subscribe

मुंबई – मुंबई एमएमआर रिजनचा पाणी प्रश्न पुढील सोडवला जाईल. मुंबई आणि मुंबई रिजन हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. पुढील 2-3 वर्षांत हा प्रश्न सोडवला जाईल आणि मुंबईकरांची तहान भागवली जाईल. मुंबई आणि परिसरासह सिडको, एमआयडीसी यांचाही पाणी प्रश्न सोडवला जाईल.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील पाणी प्रश्नासंदर्भात गंभीर आहेत, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. मुंबई एमएमआर रिजन पाणी प्रश्नासाठी झालेल्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील (एमएमआर रिजन) पाणी पुरवठा प्रकल्पांचा आढावा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेतत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गणेश नााईक, मंत्री गिरीश महाजन आणि एमएमआर रिजन, मुंबई महापालिका, सिडको, एमआयडीसीचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

काळू आणि शाई प्रकल्पांना चालना देणार 

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, मुंबई एमएमआर रिजन संदर्भातील पिण्याच्या पाण्याप्रश्नी महत्त्वाची बैठक झाली. मुंबई आणि परिसरात पाण्याचा मोठा तुटवडा आहे. नागरिकरण वाढत आहे. लोकसंख्या वाढत आहे. मात्र पाण्याचा पुरवठा होत नाही आहे. 5-6 दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. काळू आणि शाई हे दोन्ही प्रकल्प मिळून 27 टीएमसीचे हे प्रकल्प आहेत. या दोन्ही प्रकल्पांना चालना दिली तर एमएमआर रिजनाचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवू शकतात. त्यासोबतच सिडको, एमआयडीसीचाही पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो.

41 टीएमसी पाणी मिळणार 

पाणी प्रश्नावर आजच्या बैठकीत गांभीर्याने चर्चा झाली. पुढील 2-3 वर्षांत मुंबई रिजनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना वेगाने काम करण्यास सांगितलेले आहे, असे सांगत मंत्री महाजन म्हणाले की, प्रत्येक प्रलंबित प्रकल्पांना डेडलाईन देण्यात आली आहे. आजपासून वेगाने कामाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत. 41 टीएमसी पाणी या प्रकल्पांमुळे उपलब्ध होणार आहे. सिडको, एमआयडीसी आणि सर्वांचेच पाण्याचे प्रश्न यामुळे मार्गी लागतील. आम्ही वेगाने कामं करणार आहोत, सर्व विभाग एकत्र येत यासाठी काम करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने हा विषय हाती घेतला आहे, असेही गिरीश महाजनांनी सांगितले

पाणी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. शेती, उद्योग आणि पिण्यासाठी, अशा विविध बाबांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र गेल्या 60 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहेत. 400 कोटींचे प्रकल्प हे 14 हजार कोटींचे झाले आहेत. 2025 साल आलं तरीही प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे आता यामध्ये वेळ दवडून चालणार नाही, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले असल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

हेही वाचा : CM Fadnavis : गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य