मुंबई : पुणे जिल्ह्यात सध्या गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांची नोंद झालेली आहे. राज्य आरोग्य विभाग या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मुंबईत जीबीएसचा अद्याप एकही रुग्ण निदर्शनास आलेला नाही, अशी माहिती मुंबई महापालिका आरोग्य खात्यामार्फत देण्यात आली आहे. तसेच गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) च्या उपचारासाठी मुंबईतील सर्व महापालिका रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये सुसज्ज आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधोपचार, साधनसामग्री आणि तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसेच, नागरिकांनी घाबरून न जाता ‘जीबीएस’ बाबत कोणतीही लक्षणे आढळल्यास मार्गदर्शन व उपचाराकरिता जवळच्या पालिका रुग्णालयात त्वरित संपर्क करावा, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केले आहे. (Mumbai Municipal Corporation is ready in the wake of Guillain-Barré Syndrome disease)
पुणे जिल्ह्यात सध्या गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांची नोंद झाल्याने त्याची गंभीर दखल घेत मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणेने तत्काळ याबाबत बैठक घेऊन तातडीने उपाययोजना हाती घेतली आहे. मुंबईत जीबीएसचे रुग्ण अथवा त्याबाबतची काही लक्षणे आढळल्यास आणि त्यांनी पालिका यंत्रणेशी संपर्क साधल्यास त्यांना तत्काळ उपचार उपलब्ध करण्यात येणार आहेत. मुंबई महापालिका प्रशासनाने गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) बाबत आढावा घेतला. भविष्यात अशाप्रकारचे रुग्ण आढळल्यास खबरदारी म्हणून मुंबई शहरातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रमुख रुग्णालयात लहान मुले व प्रौढांकरिता व्हेंटीलेटरसह 50 आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, भविष्यात अधिक रुग्ण आढळल्यास सेव्हन हिल्स रुग्णालयात व्हेंटीलेटरसह 100 आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. मुंबई येथे जीबीएस रुग्णा करिता देण्यात येणारी सर्व औषधे उपलब्ध आहेत.
हेही वाचा – Aaditya Thackeray : वरळीकरांच्या नागरी समस्या सोडविण्यासाठी आदित्य ठाकरे पालिकेच्या दारी
मुंबईत आज रोजीपर्यंत सद्यस्थितीत गुइलेन-बेरे सिंड्रोमचा (जीबीएस) नविन रुग्ण आढळून आलेला नाही व कुठली ही वाढ झालेली नाही, असा दावा मुंबई महापालिका आरोग्य खत्याकडून करण्यात आला आहे. तसेच मुंबईतील सर्व शासकीय व खाजगी आरोग्य संस्थांना कोणत्याही नवीन जीबीएस रुग्णांची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याच्या साथरोग कक्षाला कळवण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि, सदर आजाराचे रुग्ण मुंबई शहरामध्ये वर्षभरात सर्वसाधारणपणे तुरळक प्रमाणात आढळून येतात.
जीबीएसच्या आजारात काय होते?
- गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ ऑटोइम्यून विकार आहे, ज्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच चेतासंस्थांवर हल्ला करते. यामुळे स्नायू कमजोर होतात, आणि गंभीर रुग्णामध्ये पक्षाघातही होऊ शकतो. हा आजार एखाद्या श्वसन किवा पचनसंस्थेच्या संसर्गानंतर होतो आणि त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे.
- गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा संसर्गजन्य रोग नाही आणि तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही. याचे निश्चित कारण अज्ञात आहे, पण बहुतेक वेळा श्वसन किवा पोटाच्या (पचनसंस्थेच्या) संसर्गानंतर तो होतो.
हेही वाचा – Sushama Andhare : मुख्यमंत्रीचं सर्व आका-बाकांचे सरताज आहेत का? सुषमा अंधारेंचा सवाल
आजाराची लक्षणे
- अचानक पायातील किंवा हातात कमजोरी / लकवा
- चालण्यात अचानक उद्भवलेला त्रास किंवा कमजोरी
- अनेक दिवसांपासून असलेला डायरियाशी संबंधित आजार
- नागरिकांनी घ्यावयाची काळजी
- पिण्याचे पाणी उकळून प्यावे
- स्वच्छ व ताजे अन्न खावे
- वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा
- शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित न ठेवल्यासही संसर्ग टाळता येईल
- हात किंवा पायांमध्ये अचानक वाढत जाणारा अशक्तपणा असल्यास त्वरित जवळच्या मनपा रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना दाखवावे.