HomeमहामुंबईमुंबईBMC : व्यावसायिक झोपडीधारकांकडून मालमत्ता कर वसुली सुरू, 600 जणांना देयके

BMC : व्यावसायिक झोपडीधारकांकडून मालमत्ता कर वसुली सुरू, 600 जणांना देयके

Subscribe

मुंबई महापालिकेने महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी आता झोपडपट्टीतील तब्बल 600 व्यावसायिकांना मालमत्ता कर भरण्याबाबत देयके पाठवली आहेत.

मुंबई (मारुती मोरे) : मुंबई महापालिकेने महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी आता झोपडपट्टीतील तब्बल 600 व्यावसायिकांना मालमत्ता कर भरण्याबाबत देयके पाठवली आहेत. भाजपाचे मुंबई अध्यक्ष रवी राजा यांनी झोपडपट्टीतील व्यावसायिकांकडून मालमत्ता कर वसुली करण्यास तीव्र विरोध दर्शविला होता. मात्र या विरोधाला न जुमानता मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्याने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, महसुली उत्पन्नात वाढ करण्यासाठी झोपडपट्टीतील लघु उद्योग, दुकानदारी, खाद्यपदार्थ विक्री आदी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून मालमत्ता कर वसुली करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पालिकेने परस्पर सर्वेक्षण सुरू करून लागलीच अंमलबजावणीलाही सुरुवात केली. त्यामुळे महापालिकेला दरवर्षी किमान 200 कोटी रुपयाचे उत्पन्न मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Mumbai Municipal Corporation starts collecting property tax from commercial slum owners)

मुंबईत शहर आणि उपनगर भागात 60 टक्के झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीत अनेक लोक भाड्याच्या घरात राहतात. हजारो लोक झोपडपट्टीत छोट्या टपरीवजा जागेत पान विडी शॉप, भाजीपाला, चायनीज फूड, मिसळ पाव, वडापाव, चिकन बिर्याणी, चहा विक्री, कपडे, भांडी, प्लास्टिक, स्टेशनरी, रंग, हार्डवेअर, गारमेंट, टेलरिंग, दवाखाना, लॅब, छोटी कॅन्टीन, हॉटेल्स, कच्चा माल निर्मिती, भंगार, रद्दी खरेदी, सलून, मसाला विक्री, इस्त्रीवाला, बेकरी, ज्वेलर्स, आईस्क्रीम, किराणा सामान विक्री आदी व्यवसाय पोटापाण्यासाठी करीत असतात. त्यामध्ये, त्यांना कमी-अधिक प्रमाणात कमाई होत असते.

हेही वाचा – Coastal Road : कोस्टल रोड आणि वरळी-वांद्रे सी लिंक जोडणारा उत्तर वाहिनी पूल वाहतुकीसाठी होणार खुला

मुंबई महापालिका सध्या विशेषतः इमारती, सोसायटी, संकुल, इंडस्ट्रियल इस्टेट, व्यावसायिक गाळे आदी ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या लोकांकडून व्यावसायिक मालमत्ता कराची वसुली करते. मात्र गेल्या तीन वर्षात महापालिकेने तब्बल 2 लाख कोटी रुपयांची विकासकामे, प्रकल्प, योजना, रस्ते कामे हाती घेतली. त्यामुळे पालिकेच्या 11-12 हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी सुद्धा मोडीत काढाव्या लागल्या आहेत. यापुढील काळात पालिकेकडे तिजोरीतील निधी कमी पडू शकतो.

600 व्यावसायिकांना पाठवली देयके

दरम्यान, महापालिका कर्मचाऱ्यांना पगार, बोनस, त्यांची देणी देणे यासाठी निधी कमी पडू नये, यासाठी मुंबई महापालिका आतापासून सावध व सतर्क झाली आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिकेने झोपडपट्टीत व्यवसाय करणाऱ्यांकडून मालमत्ता कर वसुली करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, पालिकेने आता झोपडपट्टीतील 600 व्यावसायिकांना रेडी रेकनर दरानुसार मालमत्ता कराची आकारणी करून त्यांना थेट देयके पाठवली आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा – Mumbai News : महापालिकेने 100 दिवसांत 100 शौचालयांची दुरुस्ती करावी; पियूष गोयल यांच्याकडून आवाहन