मुंबई : मुंबईत विविध उपाययोजना करून महापालिकेने कचऱ्याचे प्रमाण 10 हजार मेट्रिक टनावरून 6,500 मेट्रिक टनावर आणले आहे. मुंबईत दररोज निर्माण होणारे 8 हजार मेट्रिक टन एवढे डेब्रिज तयार होते. घर, इमारत, गोदाम अथवा इतर कोणतेही बांधकाम यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे डेब्रिज तयार होते. हे डेब्रिज निर्माणकर्त्याकडून स्वीकारून त्याची दहिसर येथील प्लांटमध्ये विल्हेवाट लावण्यासाठी डेब्रिजचे दर प्रति मेट्रिक टन 400 रुपयांवरून 50 टक्के कमी करून 200 रुपयांवर आणण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता मुंबईतील डेब्रिजचे प्रमाण कमी होण्यास आणि या डेब्रिजमुळे निर्माण होणारे प्रदुषण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. मुंबईकरांना डेब्रिजमधील धुळीपासून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळणार आहे. (Mumbai Municipal Corporation to reduce debris acceptance rates by 50 percent)
मुंबईत सध्या किमान 2,500 पेक्षाही जास्त इमारत बांधकामांसाठी आहेत. त्याचप्रमाणे, अनेक ठिकाणी जुनी घरे, इमारती आणि इतर वास्तू यांच्या दुरुस्तीची कामे सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे निर्माण होणाऱ्या डेब्रिजमुळे मुंबईत हवेतील धुळीचे प्रदूषण वाढण्यास मदत होते. मुंबईत दररोज साधारणपणे 8 हजार मेट्रिक टन इतके डेब्रिज तयार होत असते. या डेब्रिजमुळे हवेत निर्माण होणारे प्रदुषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘डेब्रिज ऑन कॉल’ ही सेवा उपलब्ध केली आहे. मात्र त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. तसेच, महापालिका प्रती 1 मेट्रिक टन इतके डेब्रिज हे 400 रुपये दराने स्वीकारते. त्यामुळे बिल्डर, व्यावसायिक लोक हे पैसे वाचविण्यासाठी सदर डेब्रिज हे रात्री, अपरात्री रस्त्यावर, चौकात, झाडीत कुठेही टाकून पसार होतात.
हेही वाचा – Mumbai : पदपथावर गाईगुरांच्या गोठ्यांची भर, महापालिका प्रशासन हतबल
बिल्डर, व्यावसायिकांकडून रस्त्यावर टाकण्यात आलेले डेब्रिज महापालिका यंत्रणेला वाहन व्यवस्था उपलब्ध करून उचलावे लागते आणि त्याची नजीकच्या ठिकाणी विल्हेवाट लावण्यात येते. त्यासाठी पालिकेला मनुष्यबळ, वाहन व्यवस्था आदीबाबत विशेष खर्च येतो. त्यामुळे आता महापालिकेने डेब्रिजचे दर 50 टक्के कमी करून प्रति टन 400 रुपये ऐवजी 200 रुपये प्रति टन दर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील माहिती उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.
दहिसर येथील डेब्रिज विल्हेवाट प्लांट मध्ये दररोज 600 मेट्रिक टन डेब्रिजची विल्हेवाट लावण्याची क्षमता आहे. तर महापालिका मुलुंड येथे सुद्धा डेब्रिज विल्हेवाट लावण्यासाठी दुसरा प्लांट लवकरच सुरू करणार आहे. त्यामध्ये, अंदाजे 900 मेट्रिक टन क्षमता असणार आहे.
हेही वाचा – Rani Baug : राणी बागेतील नवीन मत्स्यालयासाठीची निविदा रद्द करण्याची मागणी, कारण काय?