Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईमुंबईMumbai News : क्लीनअप मार्शलकडून आता डिजीटल पद्धतीने मिळणार दंडाची पावती

Mumbai News : क्लीनअप मार्शलकडून आता डिजीटल पद्धतीने मिळणार दंडाची पावती

Subscribe

मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांवर होणारी दंडात्मक कारवाई आता तंत्रज्ञानाचा आधार घेवून डिजीटल पद्धतीने केली जाणार आहे. त्याचा पथदर्शी प्रकल्प आज मंगळवारपासून (ता. 02 एप्रिल) 'ए' विभागात सुरू करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांवर होणारी दंडात्मक कारवाई आता तंत्रज्ञानाचा आधार घेवून डिजीटल पद्धतीने केली जाणार आहे. त्याचा पथदर्शी प्रकल्प आज मंगळवारपासून (ता. 02 एप्रिल) ‘ए’ विभागात सुरू करण्यात आला आहे. यामध्ये प्रशिक्षित क्लीनअप मार्शल कारवाई करताना आकारलेल्या दंडाची पावती हाताने न लिहिता मोबाईल ऍपद्वारे छापील पावती देणार आहेत. एवढेच नव्हे तर, ऑनलाईन पद्धतीने दंड भरण्याचा पर्याय देखील नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. (Mumbai News : The fine receipt will now be received digitally from the cleanup marshal)

हेही वाचा… महापालिका आयुक्त सौरभ राव यांचा विविध प्रकल्पांचा पाहणी दौरा

स्वच्छ मुंबई अभियान अंतर्गत अधिकाधिक लोकाभिमुख आणि तंत्रज्ञानस्नेही पुढाकार घ्यावेत, अधिकाधिक पारदर्शक यंत्रणा राबवावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार माहिती तंत्रज्ञानावर आधारित दंडात्मक आकारणीची सुरुवात क्लीनअप मार्शलच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या पथदर्शी प्रकल्पाला मिळणारा प्रतिसाद पाहून नंतर संपूर्ण मुंबईत या तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

स्वच्छता विषयक उल्लंघन केल्याबद्दल होणाऱ्या दंडात्मक वसूलीसाठी डिजीटल व ऑनलाइन पद्धतीने कार्यवाही करण्याचे मोबाइल ऍप हे महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने तयार केले आहे. मुंबईतील सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये नियुक्त सर्व क्लीन अप मार्शल संस्थांना त्याचे प्रशिक्षण मंगळवार, दिनांक 26 मार्च 2024 रोजी देण्यात आले. प्रत्येक प्रशासकीय विभागात 30 याप्रमाणे संपूर्ण मुंबईत मिळून सुमारे 700 क्लीनअप मार्शल कार्यरत आहेत. या सर्वांचा प्रशिक्षणात समावेश होता. प्रायोगिक तत्त्वावर डिजीटल कारवाई सुरू केल्यानंतर, त्यातून येणाऱ्या अनुभवांना लक्षात घेवून टप्प्याटप्प्याने संपूर्ण मुंबईत याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

क्लीनअप मार्शलकडे असलेल्या मोबाईलमध्ये महानगरपालिकेने तयार केलेले क्लीनअप मार्शल सिस्टीम ऍप असेल. यामध्ये स्वच्छतेचे नियम व नियम मोडल्याबद्दल आकारावयाची निश्चित रक्कम आधीपासूनच समाविष्ट असेल. स्वच्छतेचे नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना क्लीनअप मार्शलकडून पूर्वी हाताने लिहिलेली पावती दिली जात असे, त्यातून नागरिक व क्लीनअप मार्शल यांच्यामध्ये प्रसंगी वाद होत. या प्रकारांना आता आळा बसणार आहे. कारण, ही पावती सिस्टीम जनरेटेड म्हणजे मोबाईल ऍपमध्येच डिजीटली तयार होवून दिली जाणार आहे. त्यासाठी, क्लिनअप मार्शलकडे मोबाईल ब्लूटूथ वर चालणारा छोटा प्रिंटर देखील देण्यात आला आहे. आकारलेल्या दंडाकरिता या प्रिंटरद्वारे पावती छापून दिली जाणार आहे. छापील पावतीचा गैरवापर टाळण्यासाठी ऍपशी संलग्न अशा प्रिंटरच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पावतीचाच वापर केला जाणार आहे.

नागरिकांना मिळालेल्या पावतीवर महानगरपालिकेचे बोधचिन्ह तसेच पावती क्रमांक असेल. महानगरपालिकेच्या विभागाचे नाव, दिनांक, वेळ तसेच कारवाई केलेल्या जागेचा अक्षांश, रेखांशी देखील असेल. म्हणजेच, पावतीमध्ये गैरव्यवहाराला कोणताही वाव राहणार नाही. परिणामी, नागरिक आणि मार्शल यांच्यातील वादाचे प्रसंग टळतील. तसेच, व्यवहारांमध्ये पूर्ण पारदर्शकता राहील.

हेही वाचा… BMC : मुंबईसह नाशिक मनपामध्ये कारकीर्द गाजविणारे रमेश पवार सेवानिवृत्त

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, एखाद्या व्यक्तीला दंडाच्या रकमेचा ऑनलाइन भरणा करावयाचा असेल तर, त्यांना क्यूआर कोड स्कॅन करुन अथवा यूपीआय द्वारे रक्कम ऑनलाइन भरता येईल. त्याचप्रमाणे, मोबाईल क्रमांक पुरवलेल्या नागरिकांना त्यांच्या मोबाइलवर लघूसंदेश (एसएमएस) द्वारे देखील भरणा करण्यासाठी लिंक दिली जाईल. एसएमएस द्वारे दिलेली लिंक उघडून दंडाची रक्कम भरता येईल.

तसेच, ज्यांना रोख रक्कम भरावयाची आहे, ते रोख रक्कम देवू शकतील. या दोन्ही पद्धतींची डिजीटल पावतीच्या माध्यमातून नोंद राहणार आहे. दंडासाठी माहिती भरताना क्लीन अप मार्शल व ज्यांना दंड आकारला, ते नागरिक या दोहोंची नोंद होणार आहे. एकूणच या मोबाईल ऍपद्वारे दंड आकारणीचा सगळा हिशोब राखला जाईल व या कामामध्ये संपूर्ण पारदर्शकता येणार आहे.