मुंबई : सिनेअभिनेता सैफअली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेला तीन दिवस उलटूनही हल्लेखोराला पकडण्यात वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखेला यश आलेले नाही. काही संशयिताची अजूनही चौकशी सुरू असून चौकशीनंतर त्यांना सोडून दिले जात आहे. दरम्यान, मुंबईहून ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने प्रवास करणार्या आकाश कैलास कन्नोजिया या 31 वर्षांच्या संशयिताला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचा ताबा लवकरच वांद्रे पोलिसांकडे सोपविला जाणार आहे. (mumbai police are yet to nab saif ali khan’s assailant)
तीन दिवसांपूर्वी वांद्रे येथील राहत्या घरी चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या एका हल्लेखोराने सिनेअभिनेता सैफअली खान याच्यावर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफवर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे वांद्रे पोलिसांनी हल्ल्याच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरू केला आहे. या गुन्ह्यांचा वांद्रे पोलिसांसह झोनमधील निवडक अधिकारी आणि गुन्हे शाखेचे वीस ते पंचवीस विशेष पथकाकडून तपास केला जात आहे. हल्लेखोराच्या अटकेसाठी संबंधित पोलीस पथक मुंबईसह मुंबईबाहेर रवाना झाले असले तरी तीन दिवस उलटूनही पोलिसांना सैफअलीवर हल्ला करणारा हल्लेखोर सापडत नसल्याने वरिष्ठांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा अर्ज मागे घ्यायचाय? जाणून घ्या कसा कराल अर्ज
हल्ल्यानंतर हा आरोपी वांद्रे येथे चार ते पाच तास होता. त्यानंतर तो दादर रेल्वे स्थानकात आला आणि तेथून मुंबईबाहेर पळून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. याच दरम्यान काही संशयितांची पोलिसांनी चौकशी केली, मात्र या चौकशीतून त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला नाही. त्यामुळे चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. ही शोधमोहीम सुरु असताना या गुन्ह्यांशी संबंधित एक संशयित व्यक्ती मुंबईहून ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधून पळून गेल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती.
या आरोपीचा फोटोसह इतर माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर ज्ञानेश्वरी एक्सप्रेसची माहिती काढताना ही एक्सप्रेस गोंदिया आणि राजनांदगाव रेल्वे स्थानकादरम्यान असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर या अधिकार्यांनी दुर्ग रेल्वे स्थानकात साध्या वेशात पाळत ठेवून तिथे आलेल्या ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधील संशयिताचा शोध घेतला. यावेळी जनरल डब्बा क्रमांक 199317/सी येथून प्रवास करणार्या एका संशयिताला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याचे नाव आकाश कन्नोजिया असल्याचे उघडकीस आले. ही माहिती नंतर रेल्वे पोलिसांकडून वांद्रे पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर त्याचा ताबा घेण्यासाठी वांद्रे पोलिसांचे एक पथक तिथे रवाना झाली आहे.
हेही वाचा – Saif Ali Khan Attack : सैफ अली खान प्रकरणात पोलिसांमध्येच मतभेद, क्राइम ब्रांचने केले हे आरोप
Edited by : Ashwini A. Bhatavdekar