Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईमुंबईBMC : जकातची भरपाई महापालिकेचा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत, वर्षाखेर मिळणार 14,398 कोटींचे उत्पन्न

BMC : जकातची भरपाई महापालिकेचा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत, वर्षाखेर मिळणार 14,398 कोटींचे उत्पन्न

Subscribe

मुंबई महापालिकेला अद्यापही दरमहा नुकसान भरपाईपोटी हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. यंदा महापालिकेला दरमहा १,१९९.८४ कोटी रुपयांप्रमाणे वर्षभरात तब्बल १४,३९८.१६ कोटींचे उत्पन्न मिळणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेचे २०१७पूर्वी मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत हे जकात कर होते. त्यामुळे पालिकेला दरवर्षी किमान 7 हजार कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळत होते. २०१७मध्ये केंद्र सरकारने देशात जीएसटी कर वसुलीची पद्धत लागू केल्याने मुंबई महापालिकेची जकात करपद्धती 1 जुलै २०१७पासून बंद झाली, मात्र जीएसटी कर लागू करण्यापूर्वी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारकडून जकात नुकसान भरपाई देण्याबाबत आश्वासन घेतले होते. त्यानुसार, मुंबई महापालिकेला अद्यापही दरमहा नुकसान भरपाईपोटी हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. यंदा महापालिकेला दरमहा १,१९९.८४ कोटी रुपयांप्रमाणे वर्षभरात तब्बल १४,३९८.१६ कोटींचे उत्पन्न मिळणार आहे. (Municipal Corporation will get an income of 14,398 crores by the end of the year due to zakat payment)

विशेष बाब म्हणजे प्रारंभी वार्षिक सहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न गृहित धरून दरमहा नुकसान भरपाई रक्कम महापालिकेला मिळत होती, मात्र गेल्या सात वर्षांत या रकमेत हळूहळू वृद्धी होत गेली. महापालिकेला सन २०२५या आर्थिक वर्षात मुंबई महापालिकेला तब्बल १४,३९८.१६ कोटींचे उत्पन्न मिळणार असल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पात ठळकपणे नमूद केले आहे. या वार्षिक रकमेचे मासिक गणित मांडल्यास पालिकेला दरमहा १,१९९.८४ कोटी रुपयांचा हप्ता मिळणार असल्याचे स्पष्ट होते, तर सन २०२४मध्ये पालिकेला दरमहा १११०.९६ कोटीं रुपये याप्रमाणे १३,३३१.६३ कोटी रुपये उत्पन्न मिळाल्याचे दिसून येते.

मुंबई महापालिकेला २०१७पूर्वी जकात कर हे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत होते. त्यानंतर मालमत्ता कर, विकास नियोजन यापोटी चांगले उत्पन्न मिळत होते, मात्र केंद्र सरकारने संपूर्ण देशात २०१७ मध्ये जीएसटी लागू करण्यासाठी देशातून जकात करपद्धती हद्दपार केली, मात्र मुंबई महापालिकेला जकात रद्द होऊन जीएसटी लागू झाल्याने नुकसान भरपाईपोटी महापालिकेला दरमहा हप्ता सुरू करण्यात आला. त्यामुळे जकात उत्पन्नाची कमतरता नुकसान भरपाईपोटी मिळत असलेल्या हप्त्यामुळे भरून काढण्यास मुंबई महापालिकेला मोठी मदत होत आहे. एवढेच नव्हे तर महापालिकेचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत हे जकात नुकसान भरपाई ठरत आहे, असे म्हटले वावगे ठरणार नाही.

हेही वाचा – Akshay Shinde : आम्हाला केस लढायची नाही, बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबाची न्यायालयात भूमिका, काय घडले?

रकमेत ६,६२९.०८ कोटींची वाढ

जकात कर रद्द झाल्याने व जीएसटी कर पद्धती लागू झाल्याने नुकसान भरपाई पोटी राज्य सरकारने मुंबई महापालिकेला सन २०१७ मध्ये दरमहा ६४७.३४ कोटी रुपये याप्रमाणे वर्षभरात ७,७६८.०८ कोटी रुपये दिले. राज्य सरकारने २०१७पासून २०२४पर्यंत जकात नुकसान भरपाईपोटी वेळोवेळी ठराविक रक्कम वाढ करून दिली. आता २०२५ या आर्थिक वर्षासाठी सुद्धा महापालिकेला मासिक हप्ता वाढवून देण्यात येणार आहे. गेल्या सहा वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास २०२०मध्ये पालिकेला दरमहा ७८२.८८ कोटी रुपये प्रमाणे ९७८५.५२ कोटी रुपये, २०२१मध्ये पालिकेला दरमहा ८८०.७० कोटी रुपये प्रमाणे १०५६८.४० कोटी रुपये, २०२२मध्ये पालिकेला दरमहा ९५१.१५ कोटी रुपये प्रमाणे ११४१३.८० कोटी रुपये, २०२३मध्ये पालिकेला दरमहा १०२८.६७ कोटी रुपये प्रमाणे १२,३४४.१० कोटी रुपये, २०२४ मध्ये पालिकेला दरमहा १११०.९६ कोटी रुपये प्रमाणे १३३३१.६३ कोटी रुपये दिले आहेत. आता यंदाच्या वर्षी (२०२५) दरमहा ११९९.८४ कोटी रुपये याप्रमाणे वर्षभरात १४३९८.१६ कोटी रुपये मिळणार आहेत. २०१७मध्ये पालिकेला वर्षभरात ७७६८.०८ कोटी रुपये मिळाले. २०२४मध्ये पालिकेला वर्षभरात जकात नुकसान भरपाईपोटी १३,३३१.६३ कोटी रुपये मिळाले. त्यामुळे २०१७ पासून ते २०२४ या कालावधीत पालिकेला वाढीव रकमेपोटी ५,५६७.६३ कोटी रुपये मिळाले असल्याचे निदर्शनास येते. आता २०२५अखेर वर्षभरात महापालिकेला १४,३९८.१६ कोटी रुपये मिळणार आहेत. म्हणजेच २०२४ला देण्यात आलेल्या १३,३३१.६३ कोटी रुपयांच्या तुलनेत २०२५मध्ये पालिकेला वर्षभरात १०६६.५३ कोटी रुपये एवढी वाढीव रक्कम मिळणार असल्याचे स्पष्ट होते.

वर्ष   भरपाई रक्कम   दरमहा रक्कम   झालेली वार्षिक वाढ

२०२०     ९७८५.५२                       ७८२.८८                          ०
२०२१     १०५६८.४०                      ८८०.७०                          ९७.८२
२०२२     ११४१३.८०                       ९५१.१५                          ७०.४५
२०२३     १२३४४.१०                       १०२८.६७                        ७७.५२
२०२४     १३३३१.६३                       १११०.९६                         ८२.२९
२०२५     १४३९८.१६                      ११९९.८४                         ८८.८८

हेही वाचा – Dhananjay Munde : न्यायालयाचा धनंजय मुंडेंना धक्का! करूणा शर्मा-मुंडेंना महिन्याला ‘एवढी’ रक्कम देण्याचे आदेश


Edited By Rohit Patil