RBI restrictions New India Co operative Bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ( आरबीआय ) मुंबईतील एका सहकारी बँकेच्या बचत, चालू आणि अन्य कोणत्याही ठेवीदार खात्यांतून पैसे काढण्यावर बंदी घातली आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह, असं मुंबईतील बंदी घातलेल्या बँकेचे नाव आहे. बंदी घातल्यामुळे बँकेला नवीन कर्ज आणि ठेवी स्वीकारण्यास परवानगी मिळणार नाही. ‘आरबीआय’ने निर्बंध लादल्याची माहिती मिळतात ठेवीदारांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बँकेबाहेर ठेवीदारांनी गर्दी केली आहे.
‘आरबीआय’ने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर लादलेले निर्बंध 13 फेब्रुवारी 2025 पासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू असतील. तुम्हीही न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे ठेवीदार असाल, तुमच्या पैशांचे काय होणार? याबद्दल जाणून घेऊया…
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक सातत्याने तोट्यात चालली होती. मार्च 2024 मध्ये बँकेला 22.78 कोटी रूपयांचा तोटा झाला आहे. 2023 मध्ये हा तोटा 30.75 कोटी रूपये होता.
बँकेची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी आणि आणखी आर्थिक कचाट्यात सापडू नये म्हणून ‘आरबीआय’ने निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचा परवाना रद्द केला नाही. बँकेच्या आर्थिक स्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे, असं ‘आरबीआय’कडून सांगण्यात आले आहे. हे निर्बंध सध्या 6 महिन्यांसाठी लागू असतील. पण, जर बँकेच्या स्थिती सुधारणा झाली नाही, तर त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
ग्राहकांच्या ठेवींचे काय होणार?
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत ज्या ठेवीदारांचे पैसे असतील, त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) अंतर्गत प्रत्येक खातेदाराला पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षण मिळणार आहे. याचा अर्थ बँकेची अवस्था बिकट असेल आणि ती बंद करण्याची वेळ आली, तर प्रत्येक ग्राहकाला जास्तीत जास्त 5 लाख रूपये परत मिळतील. मात्र, तुमच्या बँक खात्यात अधिक पैसे असतील, तर तुम्हाला बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्याची अथवा तोडगा निघण्याची वाट पाहावी लागणार आहे.
बँकेवर कोणते निर्बंध लादण्यात आलेत?
- न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँके यापुढे नवीन कर्ज देऊ शकणार नाही. त्यासह जुन्या कर्जाचे नूतणीकरण करू शकणार नाही.
- ग्राहकांना बँकेत नवीन फिक्स्ड डिपॉझिट ( एफडी ) किंवा अन्य कोणतीही फिक्स्ड डिपॉझिट स्कीम उघडता येणार नाही.
- बँक कोणतीही नवीन गुंतवणूक करू शकत नाही किंवा कुणालाही पैसे देऊ शकणार नाही.
- बँक आपली मालमत्ता विकून पैसा उभा करण्याचा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही.