Burqa Politics मुंबई – मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आपल्याच सरकारमधील मंत्र्यांना पत्र लिहून नियम बदलण्याची मागणी केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा आहे. परीक्षा केंद्रांमध्ये बुरखा घालून प्रवेश देऊ नये, अशी मागणी करणारे पत्र मंत्री नितेश राणे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना दिले आहे. हिंदू मुलांसाठी वेगळे नियम आणि इतर धर्मियांना वेगळे नियम नको, त्यासोबतच अशा प्रकारामुळे कॉपीचे प्रमाण वाढू शकते, अशी भीती देखील नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
नितेश राणेंचे शिक्षणमंत्री दादा भुसेंना पत्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तीन पक्षांचे सरकार आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे हे त्यांच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. आता त्यांनी दहावी आणि बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून बुरखा घालून परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये अशी मागणी केली आहे.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, 10वी आणि 12वीच्या परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तर, गरज पडल्यास बुरखाधारींची चौकशी करण्यासाठी महिला पोलीस आणि अधिकारी किंवा शिक्षक यांना चौकशीचे निर्देश शासन स्तरावरुन देण्यात आले आहेत.
बरख्याआडून गैरप्रकार, कॉपीची शक्यता
नितेश राणे म्हणाले की, 10वी आणि 12वीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक आयुष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. या परीक्षांच्या आधारावर पुढील निर्णय विद्यार्थी घेत असतात. या परीक्षा पारदर्शकपणे झाल्या पाहिजे, कॉपीमूक्त असल्या पाहिजे. मात्र जर परीक्षार्थी बुरखा घालून आले असतील तर परीक्षा कॉपीमुक्त आणि निर्भेळ वातावरणात होत आहे, हे सांगणे कठीण होऊन जाते. बुरख्याआडून इलेक्ट्रॉनिक उपकरणांचाही वापर होऊ शकतो.
सरकारने परीक्षेच्या काळात बुरखा घालण्याची परवानगी दिली असेल तर ती त्यांनी मागे घ्यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. ते म्हणाले की, निवडणुकीच्या काळात बुरखा घालून गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. सर्व विद्यार्थ्यांना एकसारखाच गणवेश असला पाहिजे, काही विशिष्ट लोकांनाच विशेष सवलत कशासाठी असाही सवाल मंत्री राणेंनी उपस्थित केला.
हेही वाचा : Aaditya Thackeray : मुंबईत आता अदानीकर येणार, आदित्य ठाकरेंनी केले हे आरोप