Coastal Road North Lane : मुंबई : 14 हजार कोटी रुपये खर्चून मुंबई महापालिकेने उभारलेल्या कोस्टल रोडचे काम 94 टक्के एवढे पूर्ण झाले आहे. तर कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंक यांना जोडणाऱ्या उत्तर वाहिनी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण झाले. यामुळे मुंबईकरांचे वेगवान प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. (north channel bridge connecting coastal road and worli-bandra sea link inauguarated today)
उत्तर वाहिनी पुलासोबत वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन आदी भागातील प्रवाशांना कोस्टल रोड प्रकल्पावर ये-जा करण्याची सुविधा देणाऱ्या तीन आंतरमार्गिकांचे लोकार्पण देखील यावेळी होणार आहे. 27 जानेवारीपासून या सर्व मार्गिंकावरून प्रत्यक्ष वाहतूक सुरू होणार आहे. तसेच, कोस्टल रोड दररोज सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत खुला राहणार आहे.
मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर टोकापर्यंत म्हणजे नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यांतर्गत शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंतचा कोस्टल रोड (धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता) प्रकल्प (दक्षिण) उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी 10.58 किलोमीटर इतकी आहे. आजपर्यंत प्रकल्पाची 94 टक्के बांधणी पूर्ण झाली आहे. कोस्टल रोड प्रकल्पावरून 12 मार्च 2024 ते 31 डिसेंबर 2024 अखेरपर्यंत 50 लाख वाहनांनी ये-जा केली आहे. तसेच या मार्गावरून दररोज सरासरी 18 ते 20 हजार वाहनांचा प्रवास सुरू असतो.
हेही वाचा – Guillain Barre Syndrome : राज्यात गुइलेन सिंड्रोमचा पहिला बळी, पुण्यातील रुग्णाचा सोलापुरात मृत्यू
या प्रकल्पातील दक्षिण मुंबईकडून उत्तर मुंबईकडे जाणारी वाहतूक वरळी-वांद्रे सी लिंकला जोडण्यासाठी दोन पूल बांधण्यात आले आहेत. त्यातील दक्षिणेकडे येण्यासाठी बांधलेल्या पहिल्या पुलाचे लोकार्पण 12 सप्टेंबर 2024 रोजी झाले. वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी या दक्षिण वाहिनी पुलावरून उत्तरेकडे (वांद्रेकडे) जाणाऱ्या वाहतुकीला मुभा देण्यात आली होती. आता उत्तर वाहिनी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या दोन्ही पुलावरून दुतर्फा वाहतूक सुरू होणार आहे.
लोकार्पण झालेल्या पुलाची लांबी 827 मीटर इतकी आहे. यामध्ये समुद्रावर असलेली लांबी 699 मीटर तर पोहोच रस्ता 128 मीटर यांचा समावेश आहे. हा पूल बांधण्यासाठी सुमारे 2400 मेट्रिक टन वजनाचा गर्डर स्थापन करण्यात आला होता. या गर्डरची लांबी 143 मीटर तर रुंदी 27 मीटर आणि उंची 31 मीटर इतकी आहे.
दोन्ही पुलांचे काम पूर्ण झाल्यामुळे कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंक मार्गाचे वरळीकडील दोन्ही टोक आता थेट जोडले गेले आहेत. परिणामी शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) ते वांद्रे असा उत्तर दिशेने आणि वांद्रे ते शामलदास गांधी मार्ग असा दक्षिण दिशेने म्हणजेच दुतर्फा प्रवास करणे शक्य झाले आहे.
खालील मार्ग वाहतुकीसाठी खुले होणार
मरीन ड्राईव्हकडून कोस्टल रोड मार्गे सी लिंककडे जाणारी वाहतूक ही लोकार्पण होत असलेल्या उत्तर वाहिनी पुलावरून सुरू होणार
यापूर्वी मरीन ड्राईव्हकडून सी लिंककडे जाणारी वाहतूक ही दक्षिण वाहिनी पुलावरून सुरू ठेवली होती. मात्र त्यासाठी आता उत्तर वाहिनी पूल उपलब्ध झाला आहे. परिणामी दक्षिण वाहिनी पुलाचा वापर नियमित दिशेने म्हणजेच वांद्रेकडून मरीन ड्राईव्हकडे येण्यासाठी करता येईल
मरीन ड्राईव्हकडून प्रभादेवीकडे किनारी रस्त्यावरून जाण्यासाठी बांधलेली आंतरमार्गिका देखील खुली होणार आहे. तसेच मरीन ड्राईव्हकडून बिंदू माधव ठाकरे चौकाकडे जाणारी वाहतूकही खुली होणार आहे. त्यामुळे लोअर परळ, वरळी नाका आणि लोटस् जंक्शनकडे जाणारी वाहतूक खुली होईल
बिंदू माधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका देखील खुली होणार
हेही वाचा – Public Holiday : प्रजासत्ताक दिनाप्रमाणेच या हक्काच्या सुट्ट्यादेखील रविवारीच, वाचा सविस्तर