HomeमहामुंबईमुंबईPankaj Bhoyar : मुंबई बँकेच्या सहकार संकुलासाठी 50 कोटींची तरतूद करणार, सहकार...

Pankaj Bhoyar : मुंबई बँकेच्या सहकार संकुलासाठी 50 कोटींची तरतूद करणार, सहकार राज्यमंत्र्यांची ग्वाही

Subscribe

मुंबई बँकेकडून उभारण्यात येणाऱ्या सहकार संकुलासाठी राज्य सरकार 50 कोटी रुपयांची तरतूद करील, अशी ग्वाही सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.

मुंबई : मुंबई बँकेकडून उभारण्यात येणाऱ्या सहकार संकुलासाठी राज्य सरकार 50 कोटी रुपयांची तरतूद करील, अशी ग्वाही सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. तर मुंबई बँकेच्या पुढाकाराने होत असलेल्या स्वयंपुनर्विकास योजनेला दीड हजार कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी केली. (Provision of Rs 50 crores will be made for Mumbai Bank’s cooperative complex)

गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या स्वयंपुनर्विकास योजनेसंदर्भात आज (23 जानेवारी) मुंबई बँकेच्या मुख्य कार्यालयात सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली सरकारची नोडल एजन्सी असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष व भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांची बैठक पार पडली. या बैठकीला शासनाच्या वित्त, गृहनिर्माण आणि सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सहकार राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, स्वयंपुनर्विकास योजनेकडे गृहनिर्माण संस्थांचा कल हळूहळू वाढतोय. जवळपास 218 कोटींचे कर्ज मुंबई बँकेकडून या प्रकल्पासाठी देण्यात आले आहे. पण त्यांचीही मर्यादा आहे. हे वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेय. मुंबई बँकेकडे स्वयंपुनर्विकासासाठी 1600 प्रस्ताव आलेत. यासाठी राज्य सहकारी बँकेचे सहकार्य मिळाले असून इतरही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सहकार्य मिळाले तर मोठी मदत गृहनिर्माण सहकारी संस्थांना होईल. 1600 प्रस्तावांपैकी कमीतकमी एक हजार प्रस्ताव आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने निकाली निघाले पाहिजेत. जेणेकरून पंतप्रधान मोदींचे जे स्वप्न आहे ते खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरताना दिसेल आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल.

हेही वाचा – Devendra Fadnavis : दावोस दौऱ्यावरून विरोधकांची टीका; मुख्यमंत्री म्हणाले, मूळात ही असूया

यावेळी बोलताना विद्याधर अनास्कर म्हणाले की, जिल्हा आणि राज्य बँकांना रिझर्व्ह बँकेने लिमिट दिले आहे. एकंदर कर्जाच्या 5 टक्के मर्यादेपर्यंत हौसिंगला पुनर्विकासासाठी कर्जपुरवठा करता येतो. मुंबई जिल्हा बँकेला अनुभव आहे. स्वयंपुनर्विकासासाठी 1600 प्रस्ताव त्यांच्याकडे आले आहेत. या योजनेसाठी राज्य बँक दीड हजार कोटी देणार आहे. भविष्यात मुंबई, ठाण्यातून जितके अर्ज येतील ते सर्व अर्ज निकाली काढण्याची क्षमता आमच्यात असावी. यासाठी सगळ्या बँकांना एकत्र करून त्यांची लीडरशिप मुंबई बँकेने करावी, अशी आमची भूमिका आहे.

आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास सुरू आहे. त्याला ताकद, गती देणे व अर्थपूरवठा करणे याकरीता घेतलेली बैठक फलदायी झाली. सहकार मंत्र्यांनी सरकारचा प्रतिनिधी म्हणून या योजनेला सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष असल्याने एक हजार हौसिंग सोसायट्यांचे प्रकल्प मार्गी लागावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यासाठी शासन सर्वतोपरी पाठीशी राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी दिल्याचे दरेकरांनी म्हटले.

हेही वाचा – Eknath Shinde : अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन, पुरा आसमाँ बाकी है; एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

दरम्यान, राज्याचे नेतृत्व करणारी जी शिखर बँक आहे त्या राज्य सहकारी बँकेने दीड हजार कोटी रुपये स्वयंपुनर्विकासासाठी मुंबई बँकेच्या पुढाकाराने होत असलेल्या या योजनेसाठी देऊ असे आश्वासन दिले आहे. त्याकरिता विद्याधर अनास्कर यांचे आभार मानतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जन्म दिलेली ही स्वयंपुनर्विकास योजना आहे. ती सशक्त होणे आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. समाजातील, बॅंकिंग सेक्टरमधली लोकं या योजनेसाठी पुढे येत आहेत. हेच या योजनेचे यश असून घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे शिवधनुष्य उचलले आहे त्याला गती मिळताना दिसते आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच आम्ही जे सहकार भवन उभारणार आहोत त्यासाठी मंत्री पंकज भोयर यांनी 50 कोटींचा निधी देण्यासाठी सरकारकडे मागणी करू, असा शब्द दिला असल्याचेही दरेकर यावेळी म्हणाले.


Edited By Rohit Patil