मुंबई – महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेला वाद सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आता नवा पर्याय शिवसेनेला (एकनाथ शिंदे) दिला असल्याची माहिती आहे. रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या खात्यात गेले आणि अदिती तटकरेंना येथे पालकमंत्रीपद देण्यात आले होते. यावरुन शिंदेंच्या शिवसेनेचे भरत गोगावले समर्थक आक्रमक झाले होते. या वादावर तोडगा काढत आता रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला देण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांनी असा काढणार मार्ग…
महायुतीमध्ये रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदावरुन वाद निर्माण झाला आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे तर नाशिकमध्ये भाजपचे मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आग्रही आहेत. त्यांच्या समर्थकांनी पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात केली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामासत्र सुरु केले तर कुठे जाळपोळ आणि रास्तारोकोच्याही घटना घडल्या. पालकमंत्रीपद जाहीर झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याची नामुष्की महायुती सरकारवर आली.
पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेला वाद मिटवण्याचे प्रयत्न भाजपने सुरु केले आहेत. यातून तोडगा काढत गोगावेल आणि तटकरे वादावर तोडगा काढत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे असलेले मुंबईचे पालकमंत्रीपद काढून ते भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. पालकमंत्रीपदावर असा मार्ग काढण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून सुरु असल्याची माहिती आहे.
नाशिक पालकमंत्रीपदाचा वाद कायम
राष्ट्रवादीकडून रायगडचे पालकमंत्रीपद काढून घेतल्यानंतर त्यांना कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले जाणार हाही प्रश्नच आहे. दुसरीकडे नाशिकच्या वादावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काय मार्ग काढणार हाही प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.
भरतशेठने दिलेले मंत्रीपद थांबवले – भरत गोगावले
मंत्री भरत गोगावले यांनी गुरुवारी चेंबूर येथील कार्यक्रमात बोलताना म्हटले की, भरतशेठने दिलेले मंत्रीपद थांबवले आहे. लवकरच रायगडचा योग्य निर्णय होईल. मी गरीबांचा शेठ आहे. रायगडचे पालकमंत्रीपद तटकरेंकडे गेल्यामुळे शिवसेनेचे स्थानिक आमदार आणि पदाधिकारी संतप्त झाले होते.
हेही वाचा : DPDC Meeting : मुंबई डीपीडीसी बैठकीत आदित्य ठाकरेंची चर्चा, कारण काय?