मुंबई : मुंबई महापालिकेच्या भायखळा, राणीच्या बागेतील (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय) येथे मत्स्यालय उभारणीच्या कामासाठी काढलेली निविदा रद्द करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सदर निविदा काढताना अनियमितपणा, ढिसाळ नियोजन आणि मत्स्यालय उभारणीत सुरक्षिततेबाबत उद्भवणारा धोका आदी बाबींवर आमदार रईस शेख यांनी बोट ठेवत याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Rais Sheikh demands cancellation of tender for new aquarium in Rani Bagh)
भायखळा येथील राणी बागेतील प्राणी संग्रहालयाच्या 5 हजार चौरस फूट जागेत 65 कोटी रुपये खर्चून नवीन मत्स्यालय बांधण्यात येणार आहे. मात्र या मत्सालयामुळे लोकांची सुरक्षितता धोक्यात येणार आहे. तसेच, या कामासाठी एकच निविदाकार सहभागी झालेला आहे, असा रईस शेख यांनी यावेळी केला. त्याचप्रमाणे मत्सालयासाठी ढिसाळ नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे एकूणच या मत्सालय उभारणीच्या निविदेबाबत आमदार रईस शेख यांनी तीव्र आक्षेप घेत संबंधित अधिकारी आणि सल्लागारांविरुद्ध चौकशी व कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वास्तविक, सदर मत्स्यालयाची निविदा अग्निसुरक्षा आणि मानवी धोक्याच्या दोन्ही समस्या निर्माण करते. या मत्स्यालयासाठी राखीव ठेवलेला एकूण क्षेत्रफळ 5 हजार चौरस फूट आहे. ज्याची उंची 20 फुटांपेक्षा कमी आहे. असे असूनही, मुंबई महापालिका या प्रकल्पासाठी 65 कोटी रुपये खर्च करणार असून हे जगातील सर्वात महागडे मत्स्यालय बनू शकते, असा आरोप आमदार रईस शेख यांनी केला आहे.
हेही वाचा – Rais Shaikh : मुस्लिम विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव, आमदार रईस शेख यांचा आरोप
प्रस्तावित मत्स्यालय हे पेंग्विन एन्क्लोजरच्या अगदी समोर आहे, जिथे दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येतात. कोणतीही अनुचित घटना घडल्यास, यामुळे आगीचा धोका, चेंगराचेंगरी किंवा इतर सुरक्षिततेच्या समस्या उद्भवू शकतात. शिवाय, मत्स्यालयाच्या लहान आकारामुळे, कोणत्याही वेळी पुरेसे पर्यटक मत्स्यालय पाहू शकणार नाहीत. ही जागा मूळतः पेंग्विन एन्क्लोजरच्या स्मरणिका दुकानासाठी राखीव ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
भविष्यात मस्त्यालय बनू शकते मृत्यूचा सापळा
दरम्यान, फक्त एकाच निविदाकाराने भाग घेतला आहे, ज्यामुळे निष्पक्षता आणि पारदर्शकतेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण होतो. एका निविदाकाराचा सहभाग हे स्पष्टपणे सूचित करते की, निविदा प्रक्रियेत गैरप्रकार झाला आहे. त्यामुळे पुरेशा जागेचा अभाव, चेंगराचेंगरी आणि आगीच्या धोक्यांचे संभाव्य धोके आणि निविदेमध्ये असलेल्या अनियमितता विशेषतः एकाच बोलीदाराच्या सहभागामुळे ही निविदा त्वरित रद्द करण्याची मागणी रईस शेख यांनी केली. हे मस्त्यालय भविष्यात मृत्यूचा सापळा बनू शकेल. हे मत्स्यालय मफतलाल मिलच्या जमिनीवर स्थलांतरित करण्याची मागणीही शेख यांनी केली आहे.
हेही वाचा – Mumbai : पदपथावर गाईगुरांच्या गोठ्यांची भर, महापालिका प्रशासन हतबल